संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी चिमुकलीवर



जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही तिला करावी लागली कसरत

******************************************

 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  आज दिवसभर महिलांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोशल मीडिया वरून शुभेच्छा देऊन कोडकौतुक केलं जात आहे असे असतांना इकडे मात्र सहा वर्षाच्या चिमुकलीला या दिवशीही संसाराचा गाडा चालवण्यासाठी संगीताच्या तालावर दोरावर चालण्याची कसरत करून लोकांचे मनोरंजन करावे लागले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  पोटासाठी भटकंती करणाऱ्या  महिलांचे दुःख कधी कोणाला दिशेल का ? हा प्रश्न सर्वसामान्य दिसून येऊ लागला आहे.

 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून  सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा मोठा सन्मानही समाजाकडून केला जातो. महिला निर्भय आणि सक्षम झाली पाहिजे यासाठी महिला सबलीकरणावर  मोठमोठे भाष्यही केले जातात प्रत्यक्षात मात्र महिला किती असुरक्षित किती वंचित आणि किती उपेक्षित आहेत हे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावरच नजरेत येते. एकीकडे जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोशल मीडिया वरून आपल्या  आई,बहीण, काकी,मामी वहिनी, या माता-भगिनी इतर नात्यातील महिलांचे  समाजामध्ये ठळक काम करणाऱ्या महिलांचे माणसाकडून  किंबहुना समाजाकडून  कोड कौतुक पोवाडे गाऊन महिला बद्दल कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे जागतिक महिला दिन हा महिलांच्या  सबलीकरणावर चळवळ करणार दिन आहे असे वाटू लागते.तर दुसरीकडे याच दिवशीही सहा वर्षाच्या चिमुकलीला आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उंच उंच दोरावर चालण्याचा जीवघेणा खेळ सादर करून समाजाचं मनोरंजन करावं लागतं असेल तर हे विदारक चित्र जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारे ठरत आहे.

 शिरूर कासार तालुक्‍यातील तिंतरवणी येथे मुंबई -विशाखापटनम या महामार्गालगत बस स्टॅन्ड वरती माणसांची वर्दळ पाहून छत्तीसगडहुन पोट भरण्यासाठी महाराष्ट्र दाखल झालेलं एक कुटूंब सकाळीच आपला खेळ सादर करत होत. कुटुंबातील  निसा नावाची  सहा वर्षाच्या चिमुकली आजूबाजूच्या वाहनाच्या वर्दळीत आपल तूसभरहि लक्ष विचलित न होऊ देता उंच बांधलेल्या   दोरा वरती कसरतीचा खेळ सादर करत होती. नाकाच्या शेंड्यावर एक लक्ष केंद्रित करत वेगवेगळ्या प्रदर्शन सादर करत होती. हा खेळ पाहताना कुणाच्याही अंगावर काटा उभा राहावा. अगदी बोटाला धरून चालण्याचे तिचे ते वय  खेळण्या-बागडण्याच... मात्र याच वयात  हा कसरतीचा खेळ करून कुटुंबातील सात सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडलेली असल्याने या खेळातील तिची एक अग्रता तिच्यावर पडलेल्या   जबाबदारीची मोठी साक्ष देत आहे. रोज  या नाहीतर त्या गावांमधून हजार पाचशे रुपये मिळावेत यासाठी भटकंती करणार छत्तीसगड मधील विलासपूर जिल्ह्यातील कुटुंब चिमुकलीचा खेळ बीड जिल्हात  करत फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये एकीकडे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे तर दुसरीकडे  या चिमुकलीला कसरतीचा खेळ करून लोकांचे मनोरंजन करावे लागत आहे. यामुळे जागतिक महिला दिनाचा आनंद कधी या मुलीच्या जीवनात येईल का असा प्रश्न यानिमित्ताने उद्भवू लागला आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...