मैत्री दिन
एका निस्वार्थ नात्याचा सुंदर उत्सव
आपल्या आयुष्यात नाती अनेक येतात… काही रक्ताच्या नात्यांनी जोडलेली, तर काही सामाजिक बंधनांनी. पण एक नातं असं असतं जे न सांगता जोडतं, न बोलता समजतं आणि न बंधनात असूनही कायम सोबत राहतं ते म्हणजे मैत्री.
मैत्री ही नात्यांचा आरंभ आहे. ती वय, धर्म, जात, सामाजिक स्थिती यांच्या पलीकडची असते. लहानपणीची ती गोड बालमैत्री, शाळेच्या बाकांवरून सुरू झालेली निरागस सोबत, कॉलेजमधली ती धमाल, आणि नोकरी धंद्यातली खरीखुरी साथ प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर मैत्रीचं रूप बदलतं, पण तिचं सार कधीच बदलत नाही.
आजचा 'मैत्रीदिन' म्हणजे फक्त फ्रेंडशिप बॅंड, मेसेजेस, फोटो टाकण्याचा दिवस नाही. तो एक निमित्त आहे . त्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचं, त्या सगळ्या क्षणांना पुन्हा जगण्याचं.
कधी कधी आपण इतकं धावपळीचं जीवन जगतो की, एखाद्या मित्राचा फोन उचलणंही राहून जातं. पण त्याच क्षणी जर तोच मित्र संकटात सापडला तर सगळं टाकून धावून जायचं बळ फक्त मैत्रीतच असतं.
मैत्री म्हणजे केवळ एकत्र फोटो काढणं, ट्रिप्सवर जाणं, किंवा गप्पा मारणं नाही. मैत्री म्हणजे न बोलताही मनं समजणं. अडचणीत कुणी समोर नसलं तरी "मी आहे ना" म्हणणारा आवाज. कधी सल्ला देणारा, तर कधी फक्त निःशब्दपणे सोबत देणारा हात. कधी डोळ्यातले अश्रू समजणारा, तर कधी हास्याचं कारण होणारा मित्र.
जगातल्या कुठल्याही गोष्टीत इतकं निरपेक्ष प्रेम, इतकी समजूत, इतकी सहवासाची ऊब सापडत नाही जितकी ती एका मैत्रीत सापडते. आणि म्हणूनच, मैत्रीदिन एक सण आहे. हा दिवस केवळ 'हॅपी फ्रेंडशिप डे' म्हणून म्हणायचा नसतो, तर तो त्या सगळ्या मित्रांसाठी आभार मानण्याचा असतो, जे आपलं आयुष्य सुंदर करत असतात.
जगाच्या गजबजाटात, डिजिटल माध्यमांच्या युगात, आपली खरी मैत्री टिकवणं कठीण झालं आहे. पण तरीसुद्धा, खऱ्या मित्रांना वेळ लागतो, काळ लागत नाही. कितीही दिवस संपर्क नसला, तरी जिथे आपण आपलं वाटतो, तीच खरी मैत्री.
आज मैत्रीदिन आहे... चला, आज आपल्या जुन्या मित्रांना एक फोन करा, एक जुनी आठवण शेअर करा, एक साधं "आठवण आली रे" एवढं सांगूनही कुणाचं मन गहिवरू शकतं.
मैत्रीचे रंग कधी फिकट होत नाहीत… आणि म्हणूनच,
"मैत्री ही अशी गोष्ट आहे
जी जमते नाही, घडते.
ती शोधावी लागत नाही, ती घडवावी लागते…
आणि ती टिकते मनापासून!"
मैत्रीदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
जिथे मैत्री आहे, तिथेच आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आहे.

No comments:
Post a Comment