शिक्षणातील दीपस्तंभ

              शिक्षणातील दीपस्तंभ


                   लेख 09          दि. 31/05/2021

         शिक्षक म्हणजे आपल्या भविष्याचे शिल्पकार.  शिक्षक हेच आपल्या  जीवनाला मार्ग दाखवतात आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे काही शिक्षक असतात की त्यांना आपण आपल्या आयुष्यत कधीच विसरू शकत नाही त्याचे कार्य हेच त्याची संपत्ती असते.असे शिक्षक इतिहास घडवतात आणि समाजामध्ये आपला एक वेळ ठसा उमटवतात .

           सकाळची वेळ होती मुले सर्व एक ओळीत मध्ये उभे होती .गावाच्या बाजार तळावर काही वयस्कर मंडळी बसली होती .अचानक त्याच्या कानावर एक सुरेल आवाज पडतो ते मंत्रमुग्ध होतात तेथेच बसलेले इतर माणसं म्हणतात किती सुरेल आवाज आहे ना असं वाटत ऐकतच राहावे....शाळेचा परिपाठ असो की पारायण असो आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक , विदयार्थी प्रिय , शिस्तप्रिय , प्रामाणिकपणा आणि आध्यत्मिक सखोल ज्ञान असणारे येळी गावचे व्यक्तीमत्व  ए .का. कराड गुरुजी म्हणजे  एकनाथ काशिनाथ कराड गुरुजी. गुरुजी चे राहणीमान म्हणजे  अगदी साधे सरळ पांढरी टोपी , पांढरा शुभ्र सदरा, पांढरे धोतर ते पण एक टांगी  रस्त्याने चालताना धोतराचा एक टोक नेहमी आपल्या हातात असे  त्यांना  पांढरे कपडे खूप शोभून दिसत असे.

            जीवन शिक्षण मंडळ शाळेच्या कार्यरत असताना सुरवातीला सह शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले.त्यांचे जायभाये गुरुजी,नजन गुरुजी,सोळसे  गुरुजी,कराड गुरुजी ,हे त्याचे सहकारी होते. गुरुजी हे मुलांना सुरवातीला म्हासू बडे गुरुजींचा वाडा येथे भरत असलेल्या शाळेत शिक्षण देत असे .शाळेची सकाळची प्रार्थना म्हणजे परिपाठ याची सर्व जवाबदारी ही विश्वनाथ कराड गुरुजींनी  ए .का .कराड गुरुजी यांच्यावर सोपवली होती .शाळेचा परिपाठ म्हणजे ए का कराड गुरुजी अस समीकरण झाले त्यावेळे निमार्ण झाले होते.देशभक्तीपर गीते,समूहागीते सुमधुर आवाजात  ते गात असे व विद्यार्थ्यां कडुन गाऊन  ही घेत असत पसायदान म्हणण्यात  तर गुरुजींचा हातखंडाच होता.

            शाळेत मुलांना ते खूप आवडत. शाळेचा आरसा असतो तो शाळेचा परिपाठ  .या परिपाठामध्ये चांगले संस्कार ,चांगल्या सवयी यांचे धडे  दिले जात असे .ए का  कराड गुरुजी खूप हुशार आणि बुद्धिमान होते तस पाहिले तर  मुलांना सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे गणित .या गणिताची भीती जर मुलांच्या मनातून काढली असेल तर ते म्हणजे ए का कराड गुरुजीनी .आवडत विषय गणित,गणित विषयावर असलेले प्रभुत्व ,गणित शिकवण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत होती. अगदी हसून खेळून  सोप्या पद्धतीने गणिताची भीती ते मुलांच्या मनातून नाहीशी करत असत.त्याकाळात सातवीला बोर्ड परीक्षा होत असे त्यासाठी ते खूप परिश्रम घेत. त्यावेळेस  मुले हे परीक्षांसाठी पाथर्डी येथे जात असें तेव्हा गुरुजी ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या अगोदरच्या रात्री मुलांना गणिता विषयी असलेल्या आडी आड़चन विचारून त्यांच्या कडून ते सराव करून घेत असत.  या काळात  तालुक्यात जीवन शिक्षण मंदिर येळी या शाळेला आदर्श पुरस्कार प्राप्त झाला होता . 

          ए. का. कराड गुरुजींना  आध्यत्मिक विषयी खूप आवड होती .गावात सप्ताह असो की,गावात पारायण असो ,गणपती उत्सव असो गुरुजी नेहमी धार्मिक कार्यक्रमात आग्रह भागी असत .गुरुजी हे गणिता बरोबर च संस्कृत विषयांचे गाडे अभ्यासक होते. आध्यत्मिक विषयी त् सखोल ज्ञानी असल्यामुळे  त्यांनी दोन पुस्तके लिहिली एक              संत श्रेष्ठ वामनभाऊ ओवी चरित्र गाथा ,  व

 
 दुसरी श्री क्षेत्र भगवान गड वै भगवान बाबा चरित्र गाथा


शेवटी एवढेच म्हणेल 

शिक्षण म्हणजे फक्त वही-पेन नव्हे तर बुध्दीलासत्याकडे, 

भावनेला माणूसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग 

                                 म्हणजे शिक्षण"

तो शिक्षणाचा मार्ग ए.का.कराड गुरुजी आपण तयार केला. म्हणून आपल्या सारखे शिक्षक सर्वांना लाभूदे.  या लेखाच्या माध्यमातून आपणास भावपूर्ण श्रद्धांजली...!💐💐


✍🏻तनवीर पठाण सर

    8380937788

एक आठवण

 एक आठवण 



         लेख क्र.08        दि.26/05/2021

          सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असा आपला महाराष्ट्र आहे. ग्रामीण भागातून आजही विविध कला जोपासल्या जात आहेत. गावांच्या यात्रा उत्सवामधून होणारे  तमाशा, लोकनाट्य, बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, जागरण गोंधळ  कलगीतुरा , वासुदेव ,  इ .हे आज ही खूप  प्रसिद्ध आहे .

       आज  सकाळी पेपर मध्ये एक बातमी आली की  वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन झाल्याची.  लोककलेतील एक चांगली कलाकार आज काळाच्या पडद्याआड झाली .एका काळात आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्त्री असून पुरुषाची भूमिका साकारणारी  आपल्या कलेने  सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या एक उमदा कलाकार होत्या. 

          आपल्या गावामध्ये  यात्रेला नेहमी वेगवेगळे तमाशे येत असे. म्हणजे त्यावेळी त्यांना येण्यासाठी सुपारी दिली जाई . त्यांचा गावा तर्फे मानसन्मान केला जाई तेव्हा  ,दत्तोबा तांबे, दत्ता महाडिक ,पांडुरंग मुळे सह गुलाबरावबोरगावकर ,चंद्रकांत ढवळपुरीकर ,कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर, आपल्या येळी गावावरून नेहमी विठाबाई नारायणगावकर, कळू बाळू यांचे जाणे येणे असत.

          कांताबाई सातारकर सह तुकाराम खेडकर यांचा तमाशा नेहमी आपल्या परिसरात येत असे. तेव्हा आपल्या पंचकृषित गावातील श्री. दत्त नाटक  मंडळाचे  चांगलेच नाव झालेले होते .या नाटक मंडळाचा व कलाकारांचा स्वतः वै. ह. भ. प. भगवान बाबांनी  गुणगौरव केला होता . भगवानगड, परिसरात खूप नाव येळीच्या बाबूलाल पाटील यांच्या श्री. दत्त नाटक मंडळाने कमवले होते .

           मिडसांगवी यात्रेतील प्रयोग  करून  कांताबाई  सातारकर सह तुकाराम खेडकर  तमाशा मंडळाचे कलाकार व ते स्वतः  परतीचा  प्रवास करत असतांना येळी गावा जवळ आले असता त्यांची एक गाडी  खराब झाली. गाडी दुरुस्त होई पर्यंत आपण जेवण करू असे त्यांचे नियोजन ठरले .त्या साठी झाडाखाली राहुटी देण्याचे काम चालू होते . तेव्हा तेथून रस्त्याने जात असणारे  बाबूलाल पाटील यांनी ते पहिले आणि लगेच त्याच्या जवळ  गेले .पाटलाने त्यांची विचार पूस केली तेव्हा गाडी खराब झाली म्हणून थांबलो असे ते म्हणाले . पाटलांनी त्यांची स्वयंपाक करण्याची गडबड पाहिली तेव्हा ते म्हणाले मी येळीचा पोलीस पाटील आहे .असे म्हणताच कांताबाई सातारकर यांनी लगेच त्यांना ओळखले तुम्ही बाबूलाल पाटील ना...!  लगेच त्यांनी त्यांना नमस्कार घातला .बाबूलाल पाटलांचे नाव ते पाटील म्हणून नव्हे तर  श्री दत्त नाटक मंडळाचे मालक म्हणुन त्या ओळखत असत .बाबूलाल पाटील त्यांना म्हणाले  तुम्ही आमच्या गावात आज पाहुणे आहात .तुमची गाडी आमच्या गावात खराब झाली आहे .ती दुरुस्त होई पर्यंत तुम्ही आमच्या घरी जेवण साठी चला .तुम्ही स्वयंपक करू नका आज येळीकरांचा पाहुणचार घ्या . सर्वांनी  जेवण करण्यासाठी आमच्या घरी यायचे असे पाटलांनी त्यांना सांगून जेवणाचे निमंत्रण दिले. सर्व तमाशा मंडळातील लोक पाटलांच्या घरी  जेवणासाठी आले . चटकदार जेवणाचा आस्वाद घेतला  पाटलांनी त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला . कांताबाई  सातारकर जाता जाता पाटलांना म्हणाल्या मी तुमच्या येळी गावाचे नाव खूप ऐकून होते. तुम्ही कलाकारांचा खूप मान सन्मान करतात. आज ते मी माझ्या डोळ्याने पाहिले व स्वतः ते अनुभवले. माणुसकी हा एक धर्म आहे त्यावेळेस बाबूलाल पाटील यांनी तो निभावला .

          कांताबाई सातारकर सह  तुकाराम खेडकर तमाशा मंडळ हे येळी यात्रेसाठी येत असत त्या त्या वेळी ते आवर्जून डॉक्टर बाबूलाल पाटील यांची भेट घेत .आमच्या गावाच्या यात्रेसाठी येऊन यात्रेची शोभा वाढवली म्हणून डॉ. बाबुलाल पाटील गावकरी यांच्या वतीने मानपान देऊन सन्मानित करीत असत.कांताबाई सातारकर या तमाशा कलावंत आणि डॉक्टर बाबुलाल पाटील हे नाट्य कलावंत हे वैचारिक साम्य असल्यामुळे त्यांच्यात वेळोवेळी चर्चा होत असे .एकदा स्नेह भोजनासाठी  कांताबाई सातारकर या बाबूलाल पाटील यांच्या घरी आले असता त्यांना माहित होते बाबुलाल पाटील हे सर्व गुण संपन्न कलाकार आहेत त्यामुळे  त्यांनी बाबूलाल पाटील यांच्या घरातील सर्व मंडळी समोर विचारणा केली की पाटील तुम्ही आमच्या मंडळात काम कराल का ? यावर पाटील म्हणाले मी मराठी चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो. परंतु माझे वडील व त्याचे मित्र श्री विश्वनाथ कराड गुरुजी यांनी मला चित्रपटात काम करू न देता पाठीमागे आणले .मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही .आता तर गावाच्या पाटीलकीची  व घरची जबाबदारी माझ्यावर आहे मला ते शक्य नाही.....!

     या लेखाच्या माध्यमातून  कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


    तनवीर पठाण सर

जीवन शिक्षण मंदिर येळीचे द्रोणाचार्य

 जीवन शिक्षण मंदिर येळीचे  द्रोणाचार्य

                  लेख 07   दि.19/05/2021



       आजचा हा लेख खास त्या  द्रोणाचार्यासाठी आहे .त्यांच्याच योगदानामुळे आज आपले गाव हे  महाराष्ट्र राज्याला शिक्षक पुरवणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हेच ते द्रोणाचार्य आहेत ज्यांनी मुलांचे भविष्य घडवण्यासाठी व शिक्षणाचा गाडा ओढण्यासाठी शिक्षकांच्या फौजा तयार केल्या.या लेखाच्या माध्यमातून त्या सर्व गुरुजनांना एक छोटीशी श्रद्धांजली .

       महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शिक्षक पुरवणारे गाव म्हणून आपल्या गावाची एक ओळख झाली खरी पण नाव होण्यामाघे सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे आपल्या जीवन शिक्षण मंदिर  येळी या शाळेचा व येथील सर्व गुरुजनांचा . शाळेची स्थापना सन १९०५ मध्ये झाली . ही शाळा १ ली. ते ७ वी.पर्यंत होती .परंतु या शाळेत ५ ते ७वी शिक्षण घेण्यासाठी अजू बाजुतील गावातील,वड्या वस्तीवरील म्हणजेच बडेवाडी, बोंदरवाडी, जिरेवाडी, पिंपळगाव , शेकटे , फुंदे टाकळी, दैत्य नांदूर आणि सोनोशी ,कोनोशी या पंचकृषितील मुलं या शाळेत येत असे. एवढेच नव्हे तर आपल्या गावातील लोकांच्या नातलगांची मुले ही शिक्षणासाठी गावात राहत होती . तेव्हा शाळेत विद्यार्थ्यांची संख्य ही खूप होती.

         आज ज्या ठिकाणी शाळा भरते पूर्वी त्या ठिकाणी शाळा भरत नव्हती . त्यावेळेस शाळा म्हसो बडे गुरुजी यांचा वाडा , गंगाभीषण मारवाडी यांचा वाडा तसेच डाळिंबकर यांच्या गल्लीच्या वाड्यात ,भरत होती. शाळेचा गणवेश पांढरा शर्ट खाकी चड्डी, असा होता .शाळा जरी वेगवेगळ्या ठिकाणी भरत असली तरी शाळेचा परिपाठ मात्र एकच ठिकाणी होत असे .शाळेचा परिपाठ हा सध्याचे जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आहे ना त्या ठिकाणी होत असे. तेथेच शाळेचा  झेंडा वंदन ही होत असे. त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक हे विश्वनाथ यादव कराड गुरुजी हे होते.  तर सह शिक्षक एकनाथ शंकर जायभाये गुरुजी, रंगनाथ उमाजी नजन गुरुजी, प्रभाकर शंकर कुलकर्णी गुरुजी, एकनाथ काशिनाथ कराड गुरुजी. शंकर भिमाजी सोळसे गुरुजी, यांच्या सारखे हुशार,तज्ञा व शाळा हेच आपले दैवत समजणारे द्रोणाचार्य या शाळेत मुलांना ज्ञानदान करत होते.असे चांगले मेहनती आणि कष्टाळू गुरुजन हे आपल्या जीवन शिक्षण मंदिराला लाभलेले.  

      शाळेची शिस्त कधी कोणी मोडत नसे.शिक्षक असो की मुले सर्व वेळेवर शाळेत येत असे.सर्व शिक्षक हे सर्व विषय मन लावुन शिकवत असे . त्यावेळेस आपले शिक्षक व विद्यार्थी यांच्या अध्यपनावर  स्वतः मुख्याध्यापक  विश्वनाथ कराड गुरुजी हे तास चालू असतांना गुरुजनांच्या अध्यापणाचे बारकाईने निरीक्षण करत असे. विश्वनाथ कराड गुरुजी यांनी  मुख्याध्यापक म्हणून २२ वर्ष सेवा केली.महात्मा गांधी विद्यालय आणण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान राहिले.त्यांच्यात उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्यामुळे  त्यांना शाळेचा आधारस्तंभ म्हणून संबोधले जाई. 

         शाळेत शिक्षणाबरोबर समाजामध्ये  चार चौघात आपण नेहमी कसे वागले पाहिजे, आईवडिलांची कशी सेवा केली पाहिजे ,सुट्टी मध्ये कशी आईवडिलांची कामात मदत करावी, याबद्दल चे ज्ञान शिक्षक आवर्जून देत असे. तसेच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शिक्षण दिले जात असे नाटक ,गाणे, नाट्यछटा व संभाषण ,भाषण कौशल्य हे शिकविले जात असे देशाचा अभिमान मुलांन मध्ये रुजवावा, देश स्वतंत्र करण्यासाठी , या तिरंग्याचा मान राखण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले.आपल्या विद्यार्थ्यांनमध्ये  देशभक्ती जागृत होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी  शाळेच्या मैदानात झेंडावंदन करीत असे. मुलांना झेंडा दोरीत मध्ये कसा बांधावा व तो कसा फडकावा याचे प्रात्येक्षीत मुलांन कडून करून घेतले जाई.असे करण्यामाघे एक आणखी हेतू होता. तो म्हणजे तेव्हा ७ वी पास झाले की शिक्षक म्हणून नोकरी लागत असे होणाऱ्या शिक्षकाला झेंडा फडकवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणून शिकवले जाई .  रात्रीच्या वेळेस ही शाळेत ७ वी च्या मुलांनसाठी रोज रात्री जादा शिकवणी घेतली जात असे  .त्यावेळेस कधी कोणी कंटाळा केला नाही .

         शिक्षणा बरोबर शाळेत विणकाम हा विषय होता. तेव्हा शाळेला हातमाग दिले जाई .त्यावर सूतकताई ची माहिती  ही मुलांना शिक्षक देत असे. कापड कसा विनायचा या साठी  त्याची माहिती देऊन मुलांकडून सूत कतई करून घेतली जाई. जादा तास चांगले मार्गदर्शन यामुळे मुले चांगल्या मार्कांनी पास होतो असे .सातवीला बोर्ड परीक्षा ही पाथर्डी येथील श्री.तिलोक जैन विद्याल्यात होत असे .तेव्हा शाळेतील ७ वी चे मुलं घेऊन त्यांचे गुरुजन हे पाथर्डी येथे जात असे. त्या काळी १००%निकाल लागणे खूप अवघड असे परंतु जीवन शिक्षण मंदिर येळी या शाळेने सन १९५८,१९५९,१९६० सलग तीन वर्षे सातवी चा निकाल हा १००℅  लाऊन दाखवल्यामुळे उत्कृष्ट कामगिरी म्हणून जिल्हास्तरीये प्रमाणपत्र देऊन वरिष्ठ अधिकारी वर्गांकडून या गुरुजनांचा गुणगौरव करण्यात आला . 


तनवीर पठाण सर

8380937788

येळीचे बालगंधर्व

 येळीचे बालगंधर्व



                       (लेख क्र. 6)

          गाव म्हटलं की गावची यात्रा आली आणि येळीची यात्रा म्हणजे एक आगळी वेगळी यात्रा.कावड,छबिना, हंगामा, तमाशा, मिठाईची दुकाने खेळणीची दुकाने इ .खूपच भारी. येळीची यात्रा ही हनुमान जयंती नंतरच्या पहिल्या सोमवारी गावचे  ग्रामदैवत येळेश्वराची यात्रा भरते.

           यात्रा आली की यात्रा निमित्त नवीन नवीन नाटक हे दरवर्षी श्री .दत्त नाटक मंडळ  हे सादर  करत असे. नाटकाचे सर्व प्रयोग हे आपल्या गावातील सध्याचा जो  बाजार तळ आहे ना तेथे म्हणजे पूर्वेला ज्या दुकाना आहेत ना त्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होत असे.आपल्या गावात कधी ही कणात लावली नाही .फक्त स्टेजवर नाटक केले.स्टेज च्या माघे कलाकार साठी एक ड्रेसिंग रूम केली जात असेल. स्टेज चे तोंड हे नेहमी मंदीराकडे असायचे.संपूर्ण गावातील महिला मंडळ,लहान मुले, पुरुष , म्हातारे माणसे हे नाटक पाहण्यासाठी  येत असे. विशेष बाब म्हणजे या नाटक मंडळात  काम करणारे सर्व कलाकार हावशी होते.घरची परिस्थिती ही जेम तेम  होती . तरी पण अभिनयाची आवड म्हणून ते हे सर्व करत असे. गावाच्या यात्रेत कधीच या नाटक मंडळाने तिकीट लाऊन नाटक सादर केले नाही. सर्व गावकार्यसाठी  व यात्रेला येणाऱ्या पंचकृषित पाहुण्या साठी ते फ्री असे. तरी पण ज्यांना हे नाटक आवडले  ते लोक नाटकाला बक्षीस देत असे आणि त्यांनी दिलेले बक्षीसाची रक्कम ही लाऊड स्पीकर मध्ये पुकारली जात असे .

              नाटकसाठी लागणारे साहित्य म्हणजे साऊंड सिस्टम, कणात , लाईट व इतर सामग्री हे सर्व काही बाबूलाल पाटील यांच्या श्री.दत्त नाटक मंडळाकडेच असायची. नाटकातील कलाकारांची वेशभूषाकार हे येळी पासून खूप अंतर असलेल्या पैठण येथून आणले जाई.येळी ते पैठण हे अंतर खूप मोठे होते त्यावेळेस पैठण येथील पेंटर_करीम_भाई वेशभूषाकार  म्हणून खूप प्रसिद्ध होते. त्यांना या कलाकारांचे वेशभूषा  करण्यासाठी आवर्जून बोलवलं जात असे.आपल्या यात्रेच्या अगोदर पैठणची यात्रा असे .आपल्या गावातील मंडळाची लोक तेथे जात असे.तेथे गेल्यानंतर ते पेंटरची भेट घेत व  या वर्षी नाटक  कोणते बसवले आहे ,त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे .याची यादी ते पेंटरला देत असे आणि यात्रा कधी आहे त्यांना सांगितले जाई .ठरल्या दिवशी सर्व साहित्ये आपल्या सायकलवर घेऊन पेंटर करीमभाई  हे येळी येथे येत असे .करीमभाई पेंटर चे एक वैशिष्ट्य होते की ते जेव्हा ते कलाकारांची वेशभूषा करत असे तेव्हा त्या  नाटकातील  पात्रा मध्ये आपल्या कलेंनी  जिवंतपणा आणत असे .इतका सूंदर मेकअप ते करत असे. त्यावेळी ते सर्व साहित्याचा मोबदला म्हणून त्यांना ७०-१०० रु. दिले जात असे .गावची यात्रा म्हटलं की सर्वांचे नातलग ,मुली, जावई, बहिणी, यात्रेचे निमंत्रण दिले जाई आणि गावातील लोक बाहेर कोठे पण असू द्या  .या यात्रेला नक्कीच ते गावाकडे येत असे.

            एकदा काय झाले आपल्या गावातील पुढार्यांनी पाथर्डी येथील नेते मंडळी यांना यात्रेचे निमंत्रण दिले . बाबूजी आव्हाड हे पाथर्डी चे आमदार होते . खास करून गावातील नेते मंडळी यांनी  त्यांना यात्रे साठी बोलवले होते .नाटक सुरू होण्यास वेळ होता म्हणून कलाकारांची भेट घेण्यासाठी ते स्टेज च्या पाठीमाघे असलेल्या ड्रेसिंग रूम मध्ये गेले. कलाकारांनी त्यांना पलंगावर बसण्याचा आग्रह केला पण  बाबूजी आव्हाड मात्र त्या पलंगावर बसण्यास तयार होईना .तेव्हा बाजूला उभा असलेल्या बाबूलाल पाटील यांच्या एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे पलंगावर जी स्त्री बसली आहे. त्यामुळे ते त्या पलंगावर बसत नाही.स्त्री च्या बाजूला आपण कसे बसायचे असं विचार बाबूजी आव्हाड याच्या मनात येत होता. हे लक्ष्यात येताच बाबूलाल पाटील त्यांना म्हणाले ती कोणी बाई माणूस नाही हो तो आपला उत्तम_तान्हाजी_बडे आहे. आणि ड्रेसिंग रूम मध्ये एकच हस्यां उडाला .आगदी हुबेहूब स्त्री  वेशभूषा आणि मेकअप पैठणचे करीम भाई पेंटर यांनी केली होती. त्यामुळे बाबुजी आव्हाड यांच्या ही स्त्री आहे की पुरुष हे ओळखुच शकले नाही. त्याचे कारण होते पेंटर करीम भाई यांनी केलेले मेकअप आणि उत्तम बडे यांची  स्त्री पत्रातील अदाकारी.  स्त्रीचे पत्र जेव्हा ते करत असे ना. तेव्हा प्रेक्षकांनाच काय पण त्यांना ओळ्खणाऱ्याना पण ते पुरुष आहे की स्त्री हे लवकर लक्ष्यात येत नसे .उत्तम बडे हे स्त्रीचे पात्र खूप सूंदर रित्या सादर करत असे त्यांनी सुरवातीच्या काळात श्री.दत्त नाटक मंडळातील अनेक नाटकात स्त्रीचे पात्र हुबेहूब निभावले. हे पात्र येळी पंचकृषितील प्रेक्षक वर्ग कधीच विसरू शकणार नाही .उत्तम तान्हाजी बडे आणि अश्रूबा यादव बडे हे नंतरच्या काळात जागरण गोंधळ करत असे.त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही कलेच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करून नावलौकिक मिळवला.

 

✍🏻पठाण तनवीर सर✍🏻

      8380937788

गावातील आदर्शवत व्यक्तिमत्व

 गावातील आदर्शवत व्यक्तिमत्व 


         आज आपल्या देशात कोरोनाने थयमान घातले आहे .कोरोनाचा कहर आपल्याच देशात नाही तर जगात चालू आहे .सर्व देश एकमेकांना मदत करत आहेत .आज चांगले चांगले लोक एकमेकांच्या मदतीला धावत आहे. जशी लागेल तशी मदत आज लोक कर आहे .ती मदत आर्थिक असो,अन्न वाटप असो ,राहण्याची सोय असो अशी मदत करत आहे. कोणत्याना कोणत्या स्वरूपात लोक दान करत आहे .

     अशीच एक  दानशूर व्यक्ती आपल्या गावात होऊन गेली.आपल्या येळी गावात विविध समाजाचे अनेक लोक राहतात .कधी ही जातीभेद न मानणारे ,गुणागोविंदाने राहणारे .आणि प्रत्येक सणाला एकमेकांच्या घरी जाणारे . ही आहे आपल्या गावाची परंपरा .त्या काळी आपल्या येळी गावात मारवाडी समाजाचे दोन घरे होती हे जुन्या लोकांना माहीत आहे.त्यातील #तोतला  नामक एक कुटुंब होते. ते आपल्या गावात राहत असत. लग्न नंतर हा सुखी संसार चालू असतांना काही दिवसातच #गोदावरीबाई_तोतला यांच्या पतीचे निधन झाले .त्याचे पती मधेच त्यांची साथ सोडून गेल्याने आता संपूर्ण आयुष्य डोळ्या समोर उभे होते .त्याच्या माहेरची लोक त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आली .सर्वांनी त्यांची विनवणी केली. आमच्या बरोबर चल आता येथे काहीच नाही उरले तू एकटीच आहेस चल आमच्या बरोबर . परंतु त्या माऊलीने त्यांना खूप छान उत्तर दिले . मी माझ्या संसाराचा गाडा माझ्या पती बरोबर येथेच सुरू केला होता याच घरात.या घरात त्याच्या आठवणी आहेत*.राहिलेले आयुष्य मी त्याच्या आठवणीत आणि देव धर्मा मध्ये घालीन,सेवेत घालीन .पण मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर . आता फक्त या घरातून माझी आर्थिच उठेल . सर्व आलेले पाहुणे हतबल झाले आणि शेवटी  निघून गेले . 

     गोदावरीबाई तोतला ह्या खूप सज्जन आणि शांत स्वभावाच्या होत्या .ज्या घरात राहत होत्या ना तो टोलेजंग वाडा होता. त्या वाड्यात त्या एकट्याच राहत होत्या. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ सर्वांन बरोबर हसून खेळून राहायचा . आपली रोजची दिनचर्या ही भक्तीरसात घालवत असे.  गल्लीतील महिला मंडळ त्याच्या कडे ये जा करत असे ..दिवसा माघून दिवस गेले . भजन ,कीर्तन येथे होऊ लागले आता या घराचे मठात रूपांतर झाले होते .संत, महंत यांचे येळी येथे येणे जाणे असत .कधी कधी ते मुक्काम ही करत असे .संत शिरोमणी ह.भ.प.वै.वामनभाऊ महाराज हे ज्यावेळेस येळी मध्ये येत असे ते याच मठात थांबत असे. आपल्या गावातील ह.भ.प.कै. गोल्हार महाराज  तर त्याच्या कडे राहत असत महाराज यांनी या माऊलीला आपली आई मानले होते.नंतर गोल्हार महाराज हे पंढरपूर येथे शिक्षणा साठी गेले  दर नवरात्राला ते गावाकडे येत असत .

      एक दिवस  गोदावरीबाई यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना त्यांच्या घरी बोलवलं आणि त्यांना सांगितले हे पाहा हा वाडा माझा आहे .मी  माझा शेवट काळ भक्तीमध्ये येथे घालवला  माझी एक शेवटची इच्छा आहे की, माझं पूर्ण आयुष्य या गावात गेले आणि माझा शेवट ही येथेच झाला पाहिजे. मी रोज नित्य नेमाने देवाचे  नामस्मरण केले . ज्या वेळेस मी या जगात नसेल त्यावेळे भक्तीरसाने हे घर घुमू द्या .म्हणून माझ्या मरणोत्तर हा वाडा मठा साठी  (मंदिर साठी) दान मी करत आहे.असे गोदावरीबाई  ने गाववल्यास सांगितले. गोदाबाईची शेवटची इच्छा ही गावभर पसरली आणि त्या माऊलीचे सर्व जण कौतुक करू लागले. एक दिवशी त्या माऊलीला देवाज्ञा झाली.सर्व येळी गावावर शोककळाच पसरली. त्यांच्या नातेवाईक यांना निरोप दिला. सर्व आले अंतविधिची तयारी झाली त्या माऊलीला निरोप देण्यासाठी अख्ख  गाव जमा झाले .अस म्हणतात अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन जात असताना  गावातील लोकांनी त्याच्यावर  फुल,पैश्याचा वर्षाव केला होता .अंत्यविधी करून घरी आले .घरी संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला .ह भ.प.वै.गोल्हार महाराज यांनी कीर्तन केले. महाराजांनी आलेल्या नातलंगला त्यांची शेवटची इच्छा काय होती हे सांगितले. त्यांची शेवटची इच्छा ऐकून नातलग पण खूप भावुक झाले .महाराज आपणास ते पुत्र मानत होते आपणच आपल्या हाताने दान करावे व त्यांनी सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी जे मंदिर आपण बांधल त्याच्या मूर्ती आम्ही नातलग देणार  आणि त्यांनी त्या दिल्यापण.

      आज  कराड गल्ली मध्ये जे राम मंदिर आहे ना याच दानशूर माऊलीने दान केलेल्या जागेत आहे.या राम मंदिराच्या रूपात ही आदर्शवत माऊली कायम येळीकरांच्या स्मरणात राहील..!

✍🏻तनवीर पठाण सर✍🏻

     8380937788

      (लेख नंबर 4)


श्री.दत्त नाटक मंडळ ने उचलला खारीचा वाटा


 श्री.दत्त नाटक मंडळ ने उचलला खारीचा वाटा



         आपल्या गावातील व्यक्तींनी एक आदर्श आपल्या समोर ठेवला आहे .आपण फक्त त्यांच्या कार्याला उजाळा देत आहोत. मग ते धोंडीराम पाटील असो ,नामदार पठाण असो ,विश्वनाथ कराड गुरुजी असो ,गोदावरीबाई तोतला असो ,नाथा गुरुजी असो,बाबुराव फुंदे असो ,दत्तोपंत कुलकर्णी असो, असे अनेक चांगले लोक आपल्या गावात होऊन गेले . त्यांनी जे कार्य केले आहे ते खरच स्तुती करण्यासारखे आहे . ही फक्त सुरवात आहे .बाकीच्या लोकांचे कार्य व त्यांची नावे हळू हळू पुढील लेखातून येणार आहे. 

      आपल्या गावात  महात्मा गांधी विद्यालय आले खरे. पण या शाळेचा सुरवातीचा काळ  कस होता ..? गावात शाळा आल्या नंतर नेमक काय काय घडलं . त्यातीलच एक छोटासा किस्सा. आज आपल्या बरोबर शेअर करत आहे. महात्मा गांधी विद्याल्याची स्थापना ही 1960 साली आपल्या गावात झाली . सुरवातीला फक्त इ.8 वी. च्या वर्गाची सुरवात झाली होती. सर्व मुलं हे या शाळेत शिकू लागली होती. त्यावेळेस महात्मा गांधी विद्याल्याचा हा इ 8 वी.चा वर्ग गावच्या चावडी मध्ये भरत होता.आज जी शाळेची इमारत आहे ना तशी सुरवातीच्या काळात नव्हती. या वर्गाला शिकवण्यासाठी दोन शिक्षकांची म्हणजे केकाण_सर आणि दांडगे_सर यांची नेमणूक संस्थेने केली होती .केकान सर हे शेवगाव जवळील एरंडगावाचे . शाळेच्या सर्व कारभार पाहण्याची जवाबदारी ही संस्थेने त्यांच्यावर सोपवली होती .थोडक्यात तेच शाळेचे मुख्याध्यापक होते .सुरवातीला एकच वर्ग असल्यामुळे दोन शिक्षकच सर्व विषय शिकवत असे.

       गावाच्या चावडी मध्ये भरणारी ही शाळा .शाळाचे पुढील वर्ग आणण्यासाठी शाळेला जागा व कमीत कमी दोन तीन वर्ग खोल्या असाव्या असा विचार होऊ लागला .म्हणून शाळेच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी वर्गणी करायचे ठरवले.वर्गणीतून जो पैसे जमा होईल त्यातून शाळेच्या वर्ग खोल्याचे बांधकाम करू असे ठरले .सर्व स्थरातून वर्गणी जमा करण्याचे काम सुरू झाले . त्या वेळेस आपल्या गावात एक नाटक मंडळ होते . कदाचित हे बऱ्याच जणांना  माहित नसेल .त्या नाटक कंपनीचे नाव होते श्री_दत्त_नाटक_मंडळ. डॉ.बाबूलाल पाटील यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन या नाटक मंडळाची स्थापना केली होती. बाबूलाल पाटील हे एक उत्तम लेखक , अभिनेता , वादक आणि दिगदर्शक होते. त्यांनी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन शाळेच्या मदतीसाठी एक नाटक बसूया असे त्यांनी ठरवले .आता नेमकं नाटक कोणते बसायचे...? या वर खुप विचार झाला .शेवटी  त्यांनी एक नाटक निवडले.त्या नाटकातील  दानशूर पणा पाहून लोकांनी शाळेसाठी काही तरी दान दिले पाहिजे असा त्याचा हेतू होता . त्या नाटकाचे नाव होते राजा हरिश्चंद्र.  

           बाबूलाल पाटील यांनी ते नाटक खूप सुंदर रित्या बसवले .त्यामध्ये राजा हरिश्चंद्रची भूमिका स्वतः बाबूलाल पाटील यांनी केली. राजा हरिश्चंद्र च्या बायकोची म्हणजे तारामतीची भूमिका उत्तम बडे यांनी केली होती , विश्वमित्राची भूमिका आश्रूबा_बडे यांनी केली होती.तर लहान रोहिदासाची भूमिका बाबूलाल पाटील यांचे लहान भाऊ  बाबासाहेब पठाण यांनी केली होती. या नाटकात बिशनलाल_बैरागी, बाजीराव_बडे, सारंगधर_सोनार , कोळसंगीचे कुसळक,इ .अनेक कलाकार या नाटकात होते.असं म्हणतात हे नाटक पाहण्यासाठी त्या काळात  तीन ते चार हजार लोक जमा झाले होते. नाटक एवढे चांगले झाले की,नाटक  पाहुण प्रेक्षकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले होते . असा जीवंत अभिनय नाटकात सर्व कलाकारांनी केला होता . नाटक संपल्या नंतर श्री.दत्त नाटक मंडळाला  दोन_ग्लास_बक्षीस देण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून जी रक्कम जमा झाली .ती सर्व शाळेच्या बांधकाम साठी शाळेचे शिक्षक केकाण सर व दांडगे सर यांच्या कडे देण्यात आली. त्यानंतर या नाटकांने आपल्या पंचकृषित खूप नाव कमवले .या नाटक मंडळाने अनेक नाटक नंतर बसवली . नाटक मंडळाने केलेल्या या चांगल्या कार्याची दखल दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्राने घेतली .शेवटी शाळेच्या बांधकामासाठी गावातील श्री.दत्त नाटक मंडळाने पण खारीचा वाटा उचलला.


✍🏻 तनवीर पठाण सर✍🏻

   मो.न.8380937788

     लेख क्रमांक 05

रुग्णसेवक ते जनसेवक

                         रुग्णसेवक ते जनसेवक


 
      येळी गावाची दुसरी पंचवार्षिक आली होती. आता परत गावात निवडणुक होणार होती. त्यात दोन मोठे गट होते.जेव्हा  प्रतिस्पर्धी चांगले असता तेथे मात्र चांगलाच घाम निघतो. तसंच सन १९६० च्या ग्रामपंचाय निवडणूकी मध्ये झाल. त्यात दोन्ही गटाचे समसमान लोक निवडून आले.आता सरपंच कोण होणार कोणाला सरपंच कारायचे  या साठी वाटा घाटी चालू झाल्या. खूप वेळ गेला पण सरपंच पदाचा तिढा मात्र काही मिटेना शेवटी काय कारावे हा प्रश्न सर्वां समोर निर्माण झाला.निवडून आलेल्या सदस्या मध्ये अल्पसंख्याक समाजाचे एक उमेदवार होते .निवडणुकीत निवडून आलेले होते. त्यांना या वाटा घटीचे काही घेणे देणे नव्हते. आपल्या गल्लीतील सर्व लोकांच्या सांगण्यावरून ते  प्रेमापोटी उभा राहिलेले त्याकाळी अपेक्षेपेक्षा भरघोस मतांनी लोकांनी निवडूनही पण दिल. 
बिनविरोध सरपंच
         इकडे सरपंच कोण होणार यावर चर्चा चालू होती .पण सरपंच कोणाला करायचे हे मात्र ठरत नव्हते त्याच वेळेस बैठकीत बसलेले कै.बाबुराव फुंदे यांची नजर रस्त्याने जात असलेल्या  भाऊ वर पडली ते लगबगीने हातात आपली पिशवी आणि बरोबर एक व्यक्ती असे मंदिराकडे जातांना दिसले .तेव्हा लगेच कै.बाबुराव फुंदे यांच्या डोक्यात एक कल्पना आली ते सर्वांना म्हणाले आपले समसमान सदस्य आहे. आपण एक काम करू या का भाऊ ना आपण सरपंच करू, गावाला आपलेसे वाटणारे भाऊ .नाहीतरी त्यांना कोणी विरोध करणार नाही .हे त्यांना ठाऊक होत.नाहीतरी त्यांचे एकच घर आहे .जशेच भाऊंचे  नाव सुचवले तसाच सरपंच पदाचा वाद शांत झाला आणि सर्वांनी एका शब्दात त्याच्या नावाला होकार दिला,संमती दिली . थोड्या वेळाने भाऊ परत येतांना दिसले सर्वांनी त्यांना बोलवलं भाऊ इकडे या,कोठे गेले होते . एक जणाचे पोट खूप दुखत होते. म्हणून त्याला पाहण्यासाठी आणि औषध गोळ्या देण्यासाठी गेलो होतो.काय म्हणता.! सर्वांनी जो निर्णय घेतला तो त्यांना सांगण्यात आला. तेव्हा ते म्हणाले अजिबात नाही! मी आणि सरपंच, ते मला जमणार नाही . मी एक डॉक्टर आहे. माझे काम रुग्णसेवा करण. हे काही आपल्या डोक्यात बसत नाही ते मला नाही जमणार . मी नाही करू शकणार मला माफ करा  मी निघतो असे म्हणून ते निघायला लागले तर त्यांना बाकीचे म्हणाले ही पण समाजसेवाच आहे .त्यांना  सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांची मन धरणी केली.सर्वांनूमते बिनविरोध भाऊ ना  सरपंच केल.या निवडीतून भाऊ बद्दल गावाच असणार प्रेम दिसून येत.! 


       भाऊ म्हणजे एक प्रतिष्ठित नागरीक पण अल्पसंख्याक येळी गावात बोटावर मोजण्या इतके मुस्लिम समाजाचे घरे.भाऊ म्हणजे डॉ.नामदार बापूखाँ पठाण नामदारभाऊ यांचे कुटुंब खरोखरच सेवाभावी कुटुंब होते.नामदार भाऊ यांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेला. नामदार भाऊ  यांना लहान पणा पासून पैलवान की ची खूप आवड होती. परंतु त्यांनी आपले आयुष्य हे जन सेवेसाठी अर्पण केले . त्यांचा  विवाह धामणगाव येथील मेहताबबी यांच्याशी  झाला .हे दोन्ही दाम्पत्य खूप शांत आणि संयमी व कष्टाळू होते. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजणारे हे दाम्पत्य नामदार पठाण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळा पासून ते येळी येथे आपली रुग्णसेवा देत होते . नामदार पठाण यांना रूबाब आणि बिजान या दोन मुली  तसेच पाच मुले त्यात मोठा मुलगा डॉ.बाबूलाल दुसरा मुलगा डॉ.बाबासाहेब,तिसरा  चाँद, चौथा गुलाब आणि पाचवा डॉ.कबीर अस भाऊंच कुटूंब होत.
        नामदार भाऊ आपला डॉक्टरकीचा व्यावसाय ते खूप इमानदारीने करत असे. रात्रीबेरात्री कोणी ही रुग्ण त्यांच्या कडे येत असे. एव्हडच काय परगावावरून एखादा रुग्ण आला की ते त्या रुग्णांना  जेवण करूनच पाठवत असे .पैसे असो किंवा नसो.पण इलाज करणारच .त्यावेळेस त्याचा कडे एक घोडा असे. ते त्या घोड्यावर बसून टाकळी,आखेगाव, कोरडगाव,सोमठाणे,सुसरे नागलवाडी अशा अनेक ठिकाणी ते जात असे रुग्णांची सेवा करत असे. त्यामुळे त्यांचा पंचकृषित खूप चांगला प्रभाव होता.जनसामान्यांत त्यांना मानणारा चांगला वर्ग होता. आता त्यांना रुग्णसेवा करता करता  गावाचा पण कारभार पाहायचा होता.ज्या प्रमाणे रुग्णाची सेवा केली त्याच प्रमाणे गावाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती .नामदार भाऊ ने त्या संधीचे सोने केले असे म्हणणे वावगे ठरणारे नाही. 
महात्मा गांधी विद्यालय
म्हणतात ना नवा गडी नवा राज सरपंच पद आले आणि आता विकासाचे काय ..! सगळे नवे जर गावाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. म्हणून गावाच्या विकासाची सुरवात ही शिक्षणा पासून केली पाहिजे. त्या काळात गावात जीवन शिक्षण मंदिरयेळी ही १ ली ते ७ वी पर्यंत होती तिची स्थापना दि .१/०१/१९०५ ची रोजी झाली होती . सन १९६० च्या वेळेस या शाळेचे मुख्याध्यापक कै.विश्वनाथ कराड गुरुजी  हे होते. नामदार भाऊ आणि कै.विश्वनाथ कराड गुरुजी जिवलग मित्र होते. गुरुजी म्हणाले आपल्या गावात ७ वी पर्यंतच शाळा आहे आणि पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर  पाथर्डी येथे जावे लागत होते .म्हणून गुरुजींनी भाऊच्या मदतीने पुढकर  घेऊन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे महात्मा गांधी विद्याल्याची स्थापना केली. ही शाळा आणण्यासाठी गुरुजींचा सिंहाचा वाटा राहिला .(आपण त्यांच्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत)
गावात आली पहिली सहकारी सोसायटी
        त्या वेळेस आपल्या येळी गावचे भाऊसाहेब कै.दत्तोपंत  कुलकर्णी हे होते. नामदार भाऊयांनी सर्वांना बरोबर घेऊन गावात पहिले सहकारी सोसायटीचे  बांधकाम करण्याचे ठरले आणि ते बांधकाम सन १९६१ ला  झाले .पहिली सहकारी सोसायटी गाव हिता साठी बांधण्यात आली .
शासकीय गोडाऊन
        सोसायटीची स्थपणा झाली आणि सोसायटी चा कारभार वाढला. आता शेतकऱ्याने दिलेले मालची आवक वाढू लागली. धान्य  पाथर्डी येथे पाठवले जाऊ लागले .परंतु पाथर्डी येथे आवक जास्त वाढू लागल्याने धान्य घेत नसे आणि इकडे गावात आवक तर वाढली .आता धान्य साठवयाचे कोठे म्हणून इकडे तर जागा कमी पडू लागली त्या साठी काय करायचे म्हणून आपण शासकीय गोडाऊन बांधू  अशी कल्पना नामदार भाऊ यांना आली. कै.दत्तोपंत  कुलकर्णी  यांच्या पाठ पुराव्यामुळे येळी मध्ये पहिले या पंचकुशीतील शासकीय गोडाऊनची निर्मिती झाली.
शासकीय जनावरांचा दवाखाना
            येळी गावातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती होता आणि त्यावेळेस शेती साठी आणि दूध दुपत्य साठी त्याच्या कडे जनावरे खूप होती. जर या मुक्या जनावरांचे  काही दुखायला लागले तर त्यांना त्या काळात पाथर्डी येथे घेऊन जावे लागत होते. कारण त्यावेळेस फक्त पाथर्डी येथे होता शासकीय जनावरांचा दवाखाना आपल्या येळीत झाला पाहिजे सर्वांना विश्वासात घेऊ  पहिला या पंचकुशीतील  शासकीय जनावरांचा दवाखाना येळी येथे आणला.
     गावाच्या विकासासाठी सरपंच .डॉ.नामदार पठाण यांचे खूप मोठे योगदान राहिले. त्यांचा कार्यकाळ *सन१९६० ते १९६५* हा होता.भाऊंना मोलाची साथ त्याकाळी  मिळाली ती तरूण तडपदार मुलाची म्हणजे डाॅ.बाबुलाल पाटील यांची. त्याकाळात आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सुवर्ण काळ होता हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

✍🏻तनवीर पठाण सर यांच्या लेखणीतून✍🏻

येळी गावचे पाहिले सरपंच

      

    येळी गावचे पाहिले सरपंच



     आपल्या गावाची परंपरा खूप महान आहे .खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व या  गावाने दिले आहे. त्यांच्यामुळे आपल्या गावाचे तालुक्यात,जिल्ह्यात चांगले नाव झाले. हे बोलणे काही वावगे ठरणार नाही. हे ही तेव्हडे च खरे  आपला देश स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाची राज्यघटना ही आमलात आली.आपल्या राज्यघटनेत तरतूद होती की, गावाचा कारभार पाहण्यासाठी गावातील लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून किंवा सरळ निवडीतून सरपंच  निवड  करायची असे संविधानात होते.

       म्हणून पहिली ग्रामपंचायत निवडुन ही *सन 1955* ला लागली गावचे पहिले सरपंच कोण होणार ? हा प्रश्न निर्माण झाला .या साठी बरेच नावे समोर आली पण त्या काळात येळी गावचे एक प्रतिष्ठित नागरिक त्यांचे नाव होते *श्री.धोंडीराम आबाजी ढोले पाटील*. धोंडीराम पाटील हे गावात प्रतिष्ठित नागरिक होते त्यांचा मोठा चिरेबंद वाडा ,मोठी शेती, गावात चांगला मान त्यांना होता .सर्व लोकांत त्यांचे उठणे बसणे होते. गोरगरीबांना मदती साठी तत्पर असत म्हणून काही लोकांनी तुम्हीच सरपंच पदासाठी उभे राहावे असे सुचवले.

      जेथे निवडणूक आली तेथे विरोधक  नसेल तर ती निवडणूकच काय .आज काल आपण निवडणूक  पाहतो .आपल्या मतदाराला आपले प्रचार चिन्ह समजावे म्हणून नवीन नवीन शक्कल लढवली जाते . तुम्हाला हे नक्की सांगावसे वाटेल की त्या काळात निवडणूक प्रचाराचे जास्त साधन नव्हते. तेव्हा धोंडीराम पाटील यांना  निवडणूक चिन्ह मिळाले तर ते  होते *बैलजोडी*. 

     आता आपला प्रचार कसा करायचा आपले निवडणूक चिन्ह सर्वांनपर्यत कसे पोहोचायचे .तेव्हा एवढी अवगत प्रचार यंत्रणा नव्हती , साधने नव्हती .प्रचार तर करायचा आहे. म्हणून त्या वेळेस धोंडीराम पाटलांनी प्रचारासाठी एक शक्कल लढवली .आपलं निवडणूक चिन्ह सर्वांना कळावे म्हणून आपल्या घरातील बैलजोडीला पोळ्याच्या बैला सारखी सजवले आणि रात्रीच्या वेळेस हातात मशाली घेऊन .सनई - पिपाण्या, वाद्य वाजून आपली बैलजोडी घेऊन गावातून मिरवणूक काढली आपले निवडणूक चिन्हाचा  प्रचार केला. पाहा मित्रांनो असा प्रचार त्यावेळेस त्यांनी केला .ते निवडून आले आपल्या गावचे पहिले सरपंच होण्याचा मान धोंडीराम आबाजी ढोले पाटील यांना मिळाला .

    येळी गावचे पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना सन 1955 या साली मिळाला .त्याचा सरपंच पदाचा कार्यकाळ हा सन 1955  ते सन 1960 हा राहिला .आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या गावाच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या आपल्या गावाचे नाव तालुक्यात तसेच जिह्यातही गाजवले ते त्यावेळेस  लोकल बोर्डचे सदस्य झाले .निश्चितच *कै..धोंडीराम आबाजी ढोले पाटील* यांचे कार्य हे गावाच्या विकासाठी योगदानी राहिल

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ

    महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी एक पर्यटन स्थळ  इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांपासून ऐतिहासिक किल्ल्यांपर्यंत आणि पवित्र मंदिरांपासून सांस्...