पोस्टमन एका बदलत्या युगाची साक्ष
९० चं दशक… गावाच्या कुशीतील एखादा निवांत दुपारीचा वेळ. आकाशात कावळ्यांचा ओरडा, रस्त्यावर एखादा कुत्रा अंग चोळत विसावलेला, आणि लांबून येणाऱ्या सायकलच्या बेलचा एक विशिष्ट आवाज. तो आवाज म्हणजे एक वेगळाच आनंद पोस्टमन आलाय! हातात झोळी, डोक्यावर टोपी, आणि चेहऱ्यावर शांत, ओळखीचं हसू. तो पत्र घेऊन यायचा काही वेगळी बातमी नाही, पण वाट पाहणाऱ्या डोळ्यांना मात्र तीच जगण्याची आशा वाटायची. त्या काळात पत्र ही संवादाची अखेरची आणि खरी साधना होती.खुशाली पत्रं, प्रेमपत्रं, नोकरीचे अर्ज, दूर देशी गेलेल्या मुलाचं सुख-शांतीचं एक छोटं वाक्य – "आई मी ठीक आहे"… आणि हे सर्व पोस्टमनच्या झोळीतूनच यायचं. त्याचा प्रत्येक दौरा म्हणजे कुणाचंतरी हसू, कुणाचं समाधान, कुणाचं पाणी भरलेलं डोळ्यातलं पत्र. तो केवळ कर्मचारी नव्हता, तो विश्वास होता – की कुणीतरी आपलं सांगणं घेऊन चालतंय, कुणीतरी आपल्या भावना साठवून आणतोय.
पोस्टमनचा गावातला सन्मान वेगळा होता. लोक त्याच्या वाटेकडे पाहायचे, चहा पाजायचे, काही वेळा आपल्या गुपित पत्राची ‘हातात देऊन जा हं’ अशी खास विनंतीही करत. तो गावातला एक घरगुती माणूस होता. त्याला सगळ्या घरांची गोष्ट माहिती असायची, पण त्याच्या तोंडून कधी काही बाहेर यायचं नाही. त्याच्या नजरेतच गुप्ततेचं वचन असायचं.परंतु २१वं शतक उजाडलं… मोबाईल फोन आले, इंटरनेटचं युग दाराशी आलं, आणि एका क्लिकवर साऱ्या भावना, साऱ्या बातम्या पोहचू लागल्या. पत्रांचा ओघ ओसरू लागला आणि पोस्टमनच्या पिशवीतही आता सरकारी कागदपत्रं, बँकेची पत्रं, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोर्टाचे नोटीस असे थंड, निरुत्साही कागदच उरले. आता कुणी वाट पाहात नाही, ना कुणी चहा विचारतो. पोस्टमन येतो, झपकन कागद टाकतो आणि पुढचं घर. चेहऱ्यावर पूर्वीसारखं हास्यही नसतं, ना कुणा झोळीत भावनांचा भार.
आजचा पोस्टमन एक यंत्रणेत अडकलेला माणूस झाला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या वेगाने लोकांना एकमेकांशी जोडून टाकलंय, पण त्यात भावना जरा विरून गेल्यात. पत्राच्या अक्षरातला स्पर्श हरवला, आणि पोस्टमनच्या येण्याचा तो खास ‘क्षण’ही हरवला.मात्र आजही एखाद्या शेतात, खेड्यात कुठे तरी एक म्हातारी आई आपल्या मुलाच्या पोस्टची वाट पाहत असते. एखादं बाळ, पहिल्यांदा नातं समजून घ्यायचं शिकत असतं, आणि तेव्हा पोस्टमन येतो, एक जुना काळ परत जिवंत करतो .९० चा दशकातील पोस्टमन हा काळ होता . भावनांचा दूत होता आणि २१ व्या शतकातला पोस्टमन एक बदलती ओळख, पण त्याचं अस्तित्व अजूनही आपल्याला जुन्या काळाशी जोडून ठेवणारं.कारण पोस्टमन म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर एका युगाची आठवण आहे.
आठवणी कधीही जुन्या होत नाहीत, त्या काळाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात… शांतपणे, सायकलच्या बेलसारख्या हलक्या आवाजात.
























