पालकांनो, आता तरी जागे व्हा


पालकांनो, आता तरी जागे व्हा!



आजचा काळ डिजिटल माध्यमांचा आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा अतिरेक झाला आहे आणि याचे गंभीर परिणाम आता आपल्या घरातच दिसू लागले आहेत  आपल्या मुलांच्या वाढीवर, विचारांवर आणि वर्तनावर.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक पालक मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. फेसबुकवर नवनवीन पोस्ट्स, यूट्यूबवरील व्हिडिओज, इन्स्टाग्रामवरील रिल्स यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. सुरुवातीला केवळ विरंगुळा म्हणून सुरू झालेली ही सवय आता व्यसनात बदलली आहे. आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, या सगळ्या धावपळीत, आभासी दुनियेत रमताना आपण आपल्या स्वतःच्या मुलांना दुर्लक्षित करू लागलो आहोत.

लहान मुलांचं वय हे शिकण्याचं, समजून घेण्याचं आणि जडणघडण होण्याचं असतं. त्यांना सतत आपल्या पालकांची गरज असते. केवळ पोटभर अन्न, चांगले कपडे आणि शाळेची फी पुरवून आपण जबाबदारी संपली असं समजतो, पण त्यांना तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन या सगळ्यांची खरी गरज असते.

दुर्दैवाने, पालक मोबाईलमध्ये बुडालेले असताना मुलं एकटी पडतात. मग त्यांना दिशा देणारा कोणीच नसतो. ते इंटरनेटवर जे पाहतात, ऐकतात तेच त्यांचं "ज्ञान" होतं. चुकीची माहिती, हिंसक गेम्स, आक्रमक भाषा, बनावट स्टार्स – हे सगळं त्यांच्या मनात खोलवर बसतं. आणि पालकांना त्याचा पत्ता लागत नाही  कारण ते त्याच वेळी फेसबुकवर पोस्ट वाचण्यात किंवा इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्यात व्यस्त असतात.

मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, काही भीती असते, काही स्वप्नं असतात  पण ते कुणाला सांगावं? जर आईबाबा सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, तर मुलं शेवटी गप्प होतात. संवादच राहात नाही. आणि संवाद नसेल, तर नातं हळूहळू तुटायला सुरुवात होते.

आज पालक म्हणून आपली जबाबदारी केवळ मुलांना शिक्षण देण्यापुरती नाही. आपण त्यांच्या आयुष्यातला "पहिला मित्र", "पहिला शिक्षक", आणि "सर्वात मोठा आधार" असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणं  हे अत्यंत आवश्यक आहे.

पालकांनो, मोबाईलमधील आभासी जगात कितीही मजा वाटली, तरी खरी दुनिया ही तुमच्या घरात आहे  तुमच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या हसण्यात, त्यांच्या आशांमध्ये. त्यांच्यावर लक्ष द्या, त्यांचं लहानपण तुमच्या बरोबर घालवा. कारण हे क्षण पुन्हा कधीच परत येणार नाहीत.

तुमच्या एका चुकीच्या दुर्लक्षामुळे त्यांचं आयुष्य भरकटू शकतं. पण तुमच्या एका योग्य कृतीमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतं.

शेवटी एव्हढेच सांगेल

फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम थोडं बाजूला ठेवा... आणि आपल्या पाल्यावर लक्ष द्या!

कारण उद्या जेव्हा आपण वेळ द्यायला मोकळे असू, तेव्हा वेळ असेल... पण मूल आपल्या मनातून लांब गेलेलं असेल!

No comments:

Post a Comment

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...