बाप ; आयुष्यभराची झटणारी सावली.

बाप ;

आयुष्यभराची झटणारी सावली. 

    आई जशी माया असते, तशीच बाप ही आधाराची भिंत असते. तो फारसा बोलत नाही, रडत नाही, पण मनात भावनांचा समुद्र घेऊन झटत राहतो. घरातील प्रत्येकाच्या गरजा भागवताना, त्याने स्वतःला कुठेच गृहीत धरलं असतं. दिवसाच्या उजेडापासून ते रात्रीच्या काळोखापर्यंत केवळ कुटुंबाच्या सुखासाठी तो आपला सारा वेळ, श्रम आणि स्वप्नं खर्च करत राहतो.

लहानपणी मुलांना चालायला शिकवणारा बाप, पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणारा, त्यांच्या हौशीसाठी स्वतःच्या इच्छा मारणारा असतो. त्याच्या अंगावर एकाच शर्टात अनेक हिवाळे, पावसाळे जातात, पण मुलांच्या डोळ्यातलं समाधान पाहून तो आनंदी राहतो. दिवसभर कष्ट करून रात्री थकवा अंगावर घेऊन तो फक्त एवढंच म्हणतो "सगळं नीट चाललं ना?"

मात्र हाच बाप जेव्हा वयाच्या उतरत्या वळणावर पोहोचतो, जेव्हा हातपाय थकतात, जेव्हा दृष्टि कमजोर होते, तेव्हा त्याचं स्थान घरात बदलायला लागतं. ज्यांच्या सुखासाठी त्याने आयुष्यभर संघर्ष केला, तेच मुलं हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. कोणाला वेळ नसतो, कोणाला त्रास वाटतो, कोणाला त्याच्या आजारपणाची जबाबदारी नको असते.

आज समाजात अनेक वृद्ध बाप वृद्धाश्रमात दिसतात. काही घरात असूनही एकटे असतात. मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी, सोशल मीडियावर व्यस्त असलेली मुले, आणि यंत्रवत जीवनशैलीत बापासाठी एक कप चहा किंवा दोन क्षणांच्या बोलण्यातसुद्धा जागा उरत नाही. तो जिवंत असतानाच त्याला दुर्लक्षित केलं जातं  कधी टोमणे मारून, कधी नजर चुकवून, कधी जबाबदाऱ्यांची चुकवणूक करून.

या सगळ्यात दुःखद बाब म्हणजे बाप तक्रार करत नाही. त्याच्या डोळ्यात थोडासा ओलावा असतो, पण ओठावर हास्य टिकवून तो म्हणतो, "सगळं ठीक आहे." पण आतून तो तुटत असतो, थकतो, हरवतो.

समाज म्हणून आपण या वास्तवाकडे डोळसपणे पाहायला हवं. बापाचं अस्तित्व केवळ पैशापुरतं मर्यादित नाही; त्याच्या अनुभवात, मार्गदर्शनात, शांततेत आणि त्याच्या अस्तित्वात एक अमोल ठेवा दडलेला असतो. ज्या झाडाखाली आपण सावली घेतली, त्यालाच वाळवणं हे अमानुष आहे.

आजही वेळ आहे. आपल्या वडिलांना केवळ ‘बाप’ म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून समजून घ्या. त्यांच्या अनुभवांना, भावनांना, गरजांना स्थान द्या. वृद्धापकाळ म्हणजे उपेक्षेचा काळ नाही, तर सन्मानाचा आणि आधाराचा काळ असावा. कारण आज जो बाप आहे, उद्या तो आपणही होऊ. आणि त्या वेळी आपल्यालाही कोणीतरी आपली आठवण ठेवावी, इतकीच माफक अपेक्षा असेल.

तो झिजतो, पण तक्रार करत नाही.

तो थकतो, पण थांबत नाही.

तो प्रेम करतो, पण मागत नाही...

तोच आहे  "बाप"

No comments:

Post a Comment

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...