मोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ चांगले

 मोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ चांगले


      मोबाईलचा वापर हा आजच्या काळात अपरिहार्य झाला असला, तरी याचा अतिरेक हा गंभीर समस्यांना जन्म देतो. विशेषतः लहान मुले आणि तरुण पिढी मोबाईल गेम्समध्ये एवढी गुंतते की त्यांचं आयुष्यच मोबाईलच्या चौकटीत अडकून राहतं. या आभासी जगात हरवलेली मुले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून दुर्बळ बनतात. याच्या पार्श्वभूमीवर मैदानी खेळांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होतं.

मैदानी खेळ म्हणजे केवळ करमणूक नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा अविभाज्य भाग. क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो  कबड्डी,व इतर सर्वच खेळ हे  मुलांना शारीरिक व्यायामाची सवय लावतात. खेळताना शरीराची प्रत्येक हालचाल होते, स्नायूंना बळकटी मिळते, आणि हृदयाच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. सतत मैदानावर धावपळ केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, लठ्ठपणा दूर राहतो आणि फिटनेस आपसूकच टिकतो. त्यामुळे आजच्या मोबाईलवर बसून वेळ घालवणाऱ्या जीवनशैलीच्या तुलनेत मैदानी खेळ खूपच फायदेशीर ठरतात.

या खेळांमुळे मुलांचं मन प्रसन्न राहतं. मैदानावर खेळताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही मोबाईल गेममध्ये मिळू शकत नाही. खेळ म्हणजे उत्साह, जोश, चैतन्य आणि एक ऊर्जा! मैदानावर पावसात भिजून खेळणं, मातीमधे लोटांगणं घालणं, एकमेकांवर ओरडणं, हसणं-खेळणं ही सगळीच एक वेगळी दुनिया असते. ही अनुभूती प्रत्यक्ष मैदानावरच मिळते, मोबाईल स्क्रीनवर नव्हे.

मैदानी खेळ केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठीच नव्हे, तर मानसिक संतुलनासाठीही उपयोगी पडतात. खेळामुळे तणाव कमी होतो, मन शांत राहतं, आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर खेळामध्ये नेहमी एक संघभावना असते. क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनी एकत्रित खेळल्याशिवाय यश मिळत नाही. फुटबॉल किंवा हॉलीबॉलमध्ये एका खेळाडूच्या चुका इतर जण भरून काढतात. यामुळे मुलांमध्ये सहकार्य, समर्पण आणि नेतृत्वगुण विकसित होतात.

खो-खो आणि कबड्डी हे भारतीय पारंपरिक खेळ तर अधिक ऊर्जावान आणि कौशल्यवर्धक आहेत. या खेळांमध्ये खेळाडूला एकदम सजग राहावं लागतं, निर्णय तत्काळ घ्यावे लागतात आणि प्रत्येक क्षण जागरूकतेनं खेळावा लागतो. या सवयी पुढे आयुष्यात खूप उपयोगी ठरतात.

मोबाईल गेम खेळणारा मुलगा अनेकदा एकटा पडतो. तो फक्त स्क्रीनकडे पाहतो, कानात हेडफोन, आणि सभोवतालचं जग त्याला विसरायला होतं. पण मैदानी खेळ खेळणारा मुलगा मित्रांमध्ये रमतो. तो संवाद साधतो, मजा करतो, संघर्ष करतो आणि शिकतो. हा अनुभव त्याला जीवनाचं खरं शिक्षण देतो.

पालक आणि शिक्षकांनी मुलांना मोबाईलच्या आहारी जाऊ न देता मैदानावर खेळायला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांना वेळ, सुविधा आणि मानसिक पाठिंबा द्यावा लागेल. कारण मैदानी खेळांमध्ये केवळ शरीर नव्हे, तर एक आरोग्यदायी, सुसंस्कृत आणि सशक्त समाज तयार होतो.

आज जर आपण मुलांचं बालपण वाचवायचं असेल, त्यांना खऱ्या अर्थानं घडवायचं असेल, तर त्यांना मैदानावर खेळायला लावणं हीच खरी गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतून राहणाऱ्या बोटांना खेळाच्या चेंडूचा स्पर्श, धावणाऱ्या पावलांना मैदानाची माती, आणि घामाने भिजलेल्या कपड्यांना यशाचा सुगंध मिळावा  हेच खऱ्या अर्थाने बालपणाचं सौंदर्य आहे.

No comments:

Post a Comment

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...