हरवलेलं पत्र आणि स्पर्शहीन संवाद
आज दुपारी सहज जुने पुस्तके आणि कागदपत्र पाहत होतो त्या मध्ये आई-वडिलांनी आम्हाला पाठवलेली काहीं जुनी पत्र सापडली.ती पत्र वाचली तर क्षणभर स्तब्ध झालो आणि त्या जुन्या आठवणीत मी रमलो . खरंच तो एक काळ वेगळाच होता, जेव्हा पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता तर तो माणसांच्या हृदयाचा ठाव होता. ९० चं दशक म्हणजे त्या भावना जपणाऱ्या अक्षरांचं सुवर्णयुग. साधं पत्र, पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय प्रत्येकाकडे एक वेगळी आठवण, वेगळी गोष्ट असायची. त्या लिहिल्या ओळींमध्ये काळजी असायची, प्रेम असायचं, रागही असायचा, पण सगळं होतं *जिवंत*.
जेव्हा आईचं पत्र येत असे तेव्हा पानभर सूचना, पण त्या शेवटच्या दोन ओळींमध्ये मात्र तिचं जीवापाड प्रेम लपलेलं असायचं. कधी कधी एखादं आंतरदेशीयात पत्र येत असे त्यात शब्द कमी, पण भावनांचा समुद्र जास्त असायचा. पोस्टकार्डावरून एखादा मित्र थेट कुठल्या तरी प्रवासातली आठवण शेअर करत असे, आणि आपण ते वाचताना त्या जागी पोहोचलेलो असतो ते पण मनातून.
हळू हळू पुढे २१ वं शतक आले, आणि पत्रं मागे पडली. त्यांच्या जागी ई-मेल, फेसबुक मेसेज, व्हॉट्सॲप आलं. संवाद वाढला पण जवळीक हरवली. एकेकाळी आठवडाभर वाट पाहिलेलं पत्र, आता एका क्लिकमध्ये पोहोचतं पण त्याला ना शाईचा सुगंध असतो, ना भावनांची खोली. पूर्वी एकच पत्र पन्नास वेळा वाचलं जात असे; आता एक मेसेज वाचून आपण मॅसेज स्क्रोल करतो.
खरंच त्या काळात पत्राचं वाचन म्हणजे संवादाचा सण होता. पत्र हातात घेतलं की त्याच्या कडांवरून त्या व्यक्तीचे हातसुद्धा जाणवायचे. आज, स्क्रीनवरून येणाऱ्या मेसेजला ना थरथरत्या बोटांचा स्पर्श असतो, ना मनाचं ओझं. डिजिटल माध्यमं वेगाने येतात आणि जातात, पण पत्रं मनात घर करून राहतात.
कधी कधी वाटतं आजची मुलं कसं समजतील या साध्या कागदात दडलेली जादू? त्यांना काय कळणार, की प्रेमाचं खरं सौंदर्य हे स्क्रीनशिवाय असतं? की आई-वडिलांचं पत्र हृदयाच्या किती जवळचं असतं?
आज मला असं वाटतं शक्य झालं तर पुन्हा एखादं साधं पत्र लिहाव आपल्या हाताने पेनाने कुणासाठी तरी. कारण तिथे शब्द नसतात फक्त तिथे असतो एक श्वास, एक आनंद आणि एक हरवलेला काळ, जो पुन्हा जिवंत होण्याची वाट पाहतो आहे.

No comments:
Post a Comment