स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

 बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर

    बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात स्त्रीशक्तीची खरी ओळख करून देणारे नाव म्हणजे स्व. केसर काकू सोनाजीराव क्षीरसागर. राजुरीच्या (न) सरपंच पदापासून सुरुवात करून बीड जिल्ह्याच्या खासदारपदापर्यंत पोहोचलेली त्यांची राजकीय कारकीर्द खरंच प्रेरणादायी ठरते. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आपलं आयुष्य झोकून देणाऱ्या काकूंनी बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.

रेल्वेचे स्वप्न – बीडकरांच्या हृदयात घर करणारा प्रयत्न

       नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणीची खरी सुरुवात स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी केली   सन 1980 ला लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने 67 हजार मतांनी केसरबाई( काकू) क्षीरसागर या विजयी झाल्या होत्या. काकू खासदार झाल्या नंतर त्यांनी बीड रेल्वेचा सातत्याने दहा वर्ष पाठपुरावा केला केशर काकूंनी सन 1984  मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटून बीड जिल्ह्यातील नगर- बीड- परळी हा रेल्वेमार्ग करणे गरजेचे असल्यामुळे तो मंजूर करावा अशी मागणी काकूंनी  केली होती. 

         पण दुर्दैवाने काही दिवसातच देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली.  व नंतर  काही दिवसने म्हणजे सन 1984 ला लोकसभा निवडणुका पार पडल्या  यात  काकू दुसऱ्यांदा बीडच्या खासदार म्हणून निवडून आल्या यावेळेस देशाचे  पंतप्रधान राजीव गांधी हे होते  काकूंनी रेल्वेचा प्रश्न घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही भेटायला गेल्या दिल्लीला जातांना त्याच्या नेतृत्वाखाली  सदस्यांच शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन त्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीं यांना भेटल्या



व त्याच्या सूचनेनुसार रेल्वे विभागामार्फत बीड रेल्वे प्रकल्पासाठी सर्वेक्षण पार पडलं या सर्वेक्षणानंतर असा अहवाल आला की बीड हे औद्योगिक शहर नाही त्यामुळे बीडमध्ये रेल्वे मार्गावरून फार मोठा महसूल देखील मिळणार नाही त्यामुळे हा मार्ग आर्थिक दृष्ट्या परवडणारा नाही तेव्हा राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते मा.सी के जाफर शरीफ या अहवालामुळे बीडला आधीच रेल्वे मिळू शकणार नाही याची भीती काकूंना होतीस म्हणून त्यांनी जाफर शरीफ यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याचा विकासासाठी रेल्वे  खूप गरजेचे आहे असं दाखवून दिल



           आणि सभागृह देखील त्या भाषण करताना आम्हा बीडकरणा अजून किती दिवस विकासापासून दूर ठेवणार म्हणून त्यांनी रेल्वेचा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतरचा सन 1989 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून  देण्यात आला पण  काकूंचा या निवडणुकीत पराभव झाला सन 1991 मध्ये देशात मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या याच दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. इकडे बीडमधून पुन्हा केशर काकूंना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि काकू निवडून आल्या सन 1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते आणि रेल्वेमंत्री होते सुरेश कलमाडी केशर काकूंच्या दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर बीडच्या रेल्वे प्रकल्पाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यातील सर्व अडथळे दूर झाले सन 1995 मध्ये या मार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आणि या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांचे उपस्थितीत चंपावती क्रीडा मंडळावर करण्यात आलं होते

काकूंच्या राजकीय प्रवासात एक मोठं स्वप्न होतं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी. खासदार झाल्यापासून त्यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिलं. केंद्र सरकारमध्ये अनेकदा शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणं, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, पंतप्रधान आणि अगदी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून पाठपुरावा करणं बजेटमध्ये रेल्वेसाठी सुरुवातीला आर्थिक तरतूद करून घेणं, बीडमध्ये रेल्वेचं भूमिपूजन करणं, आणि त्या कामाला गती देणं – हे सगळं काकूंच्या चिकाटीचं प्रतीक आहे. आज बीडकर रेल्वेचं स्वप्न साकार होताना पाहत आहेत, तेव्हा त्यामागे स्वर्गीय काकूंचा दूरदृष्टीपूर्ण वाटा असल्याचं कोणीही विसरू शकत नाही. बीडमध्ये रेल्वे स्थानक उभं राहताना ते काकूंच्या नावाने गौरवलं जावं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

   *शिक्षणाच्या क्षेत्रातील भव्य कामगिरी*

काकूंचा विश्वास होता की, गावोगावी ज्ञानगंगा पोहोचली पाहिजे. यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालयं आणि विविध शैक्षणिक प्रकल्प उभे केले.

बीड जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळांचं जाळं उभं केलं.





मेडिकल कॉलेज, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सैनिक स्कूल यांसारख्या संस्थांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व राष्ट्रीय स्तरावर करिअरची दारे खुली झाली.



टीव्ही केंद्र, रेडिओ केंद्र आणि सूतगिरणीसारख्या प्रकल्पांनी बीडच्या जनतेपर्यंत आधुनिक साधनं व रोजगार पोहोचवला.

  काकूंच्या प्रयत्नांमुळे हजारो मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळाली, तर ग्रामीण भागात रोजगाराची साधनं निर्माण झाली.

सामाजिक कार्य आणि सन्मान:-

काकू केवळ राजकारणी नव्हत्या, तर त्या जनतेच्या हृदयातली सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

आशिया खंडातील प्रथम महिला चेअरमन म्हणून साखर कारखान्याचं यशस्वी नेतृत्व करण्याचं मानांकन काकूंना मिळालं.

  गोरगरीब जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, महिलांना सबलीकरणाची संधी देणं, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणं  हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मराठवाडा भूषण आणि शिक्षण शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात आलं.

   बीडच्या विकासातील सिंहाचा वाटा

काकूंनी बीड जिल्ह्यासाठी केलेली कामगिरी बहुआयामी आहे. उद्योग, शिक्षण, रेल्वे, प्रसारमाध्यमं, कृषी, महिला सबलीकरण – प्रत्येक क्षेत्रात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी काकूंनी ज्या प्रमाणात प्रयत्न केले, त्यामुळं आजही त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर या केवळ बीडच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होत्या. त्यांचं आयुष्य हे ध्येय, जिद्द, चिकाटी आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचं प्रतीक आहे. आज बीडकर रेल्वेच्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, तेव्हा हे स्वप्न साकार करण्यामागे काकूंच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.

 त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील.

              @तनवीर पठाण सर@

           काझी नगर जालना रोड बीड







प्लास्टिक एक वाढती समस्या

 प्लास्टिक एक वाढती समस्या



आपण ज्या वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्याच वेगाने आपण पर्यावरणाच्या हानीकडे देखील वाटचाल करत आहोत. आज शहरांमध्ये पाय ठेवला की जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात दिसते, ती म्हणजे प्लास्टिक. रस्त्यांवर, दुकानांमध्ये, कचराकुंड्यांत, वाहत्या नाल्यांमध्ये  सर्वत्र प्लास्टिकचं साम्राज्य पसरलेलं दिसतं.


प्रत्येक किरकोळ खरेदीसोबत येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, फूड पॅकिंग मटेरियल, चमचे, स्ट्रॉ, कटलरी यांचा वापर इतक्या सहजतेने केला जातो की त्याची सवय आपल्या रोजच्या जगण्यात खोलवर रुजली आहे. हीच सवय आज शहरासाठी एक मोठं संकट बनली आहे.


प्लास्टिकचा मुख्य धोका म्हणजे तो सहजपणे नाश पावणारा पदार्थ नाही. एकदा प्लास्टिक तयार झालं की ते शेकडो वर्षे नष्ट न होता पर्यावरणात राहू शकतं. त्यामुळे शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या टनोगणिक प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.

     पावसाळ्यात शहरांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवते, नाले तुंबतात, रस्ते जलमय होतात  यामागे बहुतांश कारण प्लास्टिक आहे. वापरून फेकून दिलेले प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो आणि संपूर्ण शहराचे पाणी व्यवस्थापन कोलमडून पडते.आरोग्याच्या दृष्टीनेही प्लास्टिक हा एक मोठा धोका आहे. प्लास्टिक जाळल्यावर त्यातून निघणारे धुर आणि रसायने हे फुफ्फुसांचे, त्वचेचे आणि इतर अनेक आजारांचे कारण ठरतात. एवढंच नाही तर प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडतात. समुद्रात गेलेलं प्लास्टिक मासे आणि अन्य सागरी प्राणी खातात, ज्याचा शेवटी मानवाच्या अन्नसाखळीत शिरकाव होतो.


सरकारने अनेक वेळा प्लास्टिकवर बंदी घातली आहे, पण प्रत्यक्षात ही बंदी शहरांमध्ये फारशी यशस्वी ठरत नाही. कारण आपल्याला त्याचे गंभीर परिणाम जाणवत नाहीत. ग्राहक प्लास्टिक घेतात, विक्रेते देतात, प्रशासन दुर्लक्ष करतं  आणि या साखळीत आपलं शहर हळूहळू प्लास्टिकच्या दलदलीत अडकतं.


या समस्येचा उपाय कोणत्या एका यंत्रणेकडून अपेक्षित नाही. त्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बाजारात जाताना कापडी पिशवी वापरणे, सिंगल यूज प्लास्टिक टाळणे, आपल्या परिसरात प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करणे ही लहान वाटणारी पण फार मोठा परिणाम करणारी पावलं आहेत.


शहरांनी पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवे  उदा. जैविक कचरा व्यवस्थापन, रिसायकलिंग प्लांट्स, प्लास्टिक संकलन केंद्र, आणि शालेय स्तरावरूनच पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करणे. स्थानिक उद्योगांना मदत करणं  हाही एक सकारात्मक उपाय होऊ शकतो.


शेवटी, शहरातील वाढती प्लास्टिक समस्या ही नुसती स्वच्छतेची नाही, ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जर आपण सजग नाही राहिलो, तर उद्या आपली शहरं प्लास्टिकच्या डोंगराखाली गुदमरून जातील. म्हणूनच आजच, आत्ता, या क्षणीच आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे  "मी प्लास्टिक नको म्हणतो!"आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ, हरित आणि सुरक्षित शहर देण्याची हीच वेळ आहे. नाहीतर विकासाच्या नावाखाली आपण आपले पर्यावरण गमावून बसू........

मैत्री दिन एका निस्वार्थ नात्याचा सुंदर उत्सव

 मैत्री दिन 

एका निस्वार्थ नात्याचा सुंदर उत्सव



    आपल्या आयुष्यात नाती अनेक येतात… काही रक्ताच्या नात्यांनी जोडलेली, तर काही सामाजिक बंधनांनी. पण एक नातं असं असतं जे न सांगता जोडतं, न बोलता समजतं आणि न बंधनात असूनही कायम सोबत राहतं ते म्हणजे मैत्री.

   मैत्री ही नात्यांचा  आरंभ आहे. ती वय, धर्म, जात, सामाजिक स्थिती यांच्या पलीकडची असते. लहानपणीची ती गोड बालमैत्री, शाळेच्या बाकांवरून सुरू झालेली निरागस सोबत, कॉलेजमधली ती धमाल, आणि नोकरी धंद्यातली खरीखुरी साथ  प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर मैत्रीचं रूप बदलतं, पण तिचं सार कधीच बदलत नाही.


   आजचा 'मैत्रीदिन' म्हणजे फक्त फ्रेंडशिप बॅंड, मेसेजेस, फोटो टाकण्याचा दिवस नाही. तो एक निमित्त आहे . त्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचं, त्या सगळ्या क्षणांना पुन्हा जगण्याचं.

कधी कधी आपण इतकं धावपळीचं जीवन जगतो की, एखाद्या मित्राचा फोन उचलणंही राहून जातं. पण त्याच क्षणी जर तोच मित्र संकटात सापडला तर सगळं टाकून धावून जायचं बळ फक्त मैत्रीतच असतं.

मैत्री म्हणजे केवळ एकत्र फोटो काढणं, ट्रिप्सवर जाणं, किंवा गप्पा मारणं नाही. मैत्री म्हणजे न बोलताही मनं समजणं. अडचणीत कुणी समोर नसलं तरी "मी आहे ना" म्हणणारा आवाज. कधी सल्ला देणारा, तर कधी फक्त निःशब्दपणे सोबत देणारा हात. कधी डोळ्यातले अश्रू समजणारा, तर कधी हास्याचं कारण होणारा मित्र.

   जगातल्या कुठल्याही गोष्टीत इतकं निरपेक्ष प्रेम, इतकी समजूत, इतकी सहवासाची ऊब सापडत नाही  जितकी ती एका मैत्रीत सापडते. आणि म्हणूनच, मैत्रीदिन एक सण आहे. हा दिवस केवळ 'हॅपी फ्रेंडशिप डे' म्हणून म्हणायचा नसतो, तर तो त्या सगळ्या मित्रांसाठी आभार मानण्याचा असतो, जे आपलं आयुष्य सुंदर करत असतात.

  जगाच्या गजबजाटात, डिजिटल माध्यमांच्या युगात, आपली खरी मैत्री टिकवणं कठीण झालं आहे. पण तरीसुद्धा, खऱ्या मित्रांना वेळ लागतो, काळ लागत नाही. कितीही दिवस संपर्क नसला, तरी जिथे आपण आपलं वाटतो, तीच खरी मैत्री.


आज मैत्रीदिन आहे... चला, आज आपल्या जुन्या मित्रांना एक फोन करा, एक जुनी आठवण शेअर करा, एक साधं "आठवण आली रे" एवढं सांगूनही कुणाचं मन गहिवरू शकतं.

मैत्रीचे रंग कधी फिकट होत नाहीत… आणि म्हणूनच,


"मैत्री ही अशी गोष्ट आहे 

जी जमते नाही, घडते.

ती शोधावी लागत नाही, ती घडवावी लागते…

आणि ती टिकते  मनापासून!"


मैत्रीदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जिथे मैत्री आहे, तिथेच आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आहे.

पोस्टमन एका बदलत्या युगाची साक्ष

 पोस्टमन एका बदलत्या युगाची साक्ष

      ९० चं दशक… गावाच्या कुशीतील एखादा निवांत दुपारीचा वेळ. आकाशात कावळ्यांचा ओरडा, रस्त्यावर एखादा कुत्रा अंग चोळत विसावलेला, आणि लांबून येणाऱ्या सायकलच्या बेलचा एक विशिष्ट आवाज. तो आवाज म्हणजे एक वेगळाच आनंद  पोस्टमन आलाय! हातात झोळी, डोक्यावर टोपी, आणि चेहऱ्यावर शांत, ओळखीचं हसू. तो पत्र घेऊन यायचा  काही वेगळी बातमी नाही, पण वाट पाहणाऱ्या डोळ्यांना मात्र तीच जगण्याची आशा वाटायची. त्या काळात पत्र ही संवादाची अखेरची आणि खरी साधना होती.खुशाली पत्रं, प्रेमपत्रं, नोकरीचे अर्ज, दूर देशी गेलेल्या मुलाचं सुख-शांतीचं एक छोटं वाक्य – "आई मी ठीक आहे"… आणि हे सर्व पोस्टमनच्या झोळीतूनच यायचं. त्याचा प्रत्येक दौरा म्हणजे कुणाचंतरी हसू, कुणाचं समाधान, कुणाचं पाणी भरलेलं डोळ्यातलं पत्र. तो केवळ कर्मचारी नव्हता, तो विश्वास होता – की कुणीतरी आपलं सांगणं घेऊन चालतंय, कुणीतरी आपल्या भावना साठवून आणतोय.


       पोस्टमनचा गावातला सन्मान वेगळा होता. लोक त्याच्या वाटेकडे पाहायचे, चहा पाजायचे, काही वेळा आपल्या गुपित पत्राची ‘हातात देऊन जा हं’ अशी खास विनंतीही करत. तो गावातला एक घरगुती माणूस होता. त्याला सगळ्या घरांची गोष्ट माहिती असायची, पण त्याच्या तोंडून कधी काही बाहेर यायचं नाही. त्याच्या नजरेतच गुप्ततेचं वचन असायचं.परंतु २१वं शतक उजाडलं… मोबाईल फोन आले, इंटरनेटचं युग दाराशी आलं, आणि एका क्लिकवर साऱ्या भावना, साऱ्या बातम्या पोहचू लागल्या. पत्रांचा ओघ ओसरू लागला आणि पोस्टमनच्या पिशवीतही आता सरकारी कागदपत्रं, बँकेची पत्रं, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोर्टाचे नोटीस असे थंड, निरुत्साही कागदच उरले. आता कुणी वाट पाहात नाही, ना कुणी चहा विचारतो. पोस्टमन येतो, झपकन कागद टाकतो आणि पुढचं घर. चेहऱ्यावर पूर्वीसारखं हास्यही नसतं, ना कुणा झोळीत भावनांचा भार.

      आजचा पोस्टमन एक यंत्रणेत अडकलेला माणूस झाला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या वेगाने लोकांना एकमेकांशी जोडून टाकलंय, पण त्यात भावना जरा विरून गेल्यात. पत्राच्या अक्षरातला स्पर्श हरवला, आणि पोस्टमनच्या येण्याचा तो खास ‘क्षण’ही हरवला.मात्र आजही एखाद्या शेतात, खेड्यात कुठे तरी एक म्हातारी आई आपल्या मुलाच्या पोस्टची वाट पाहत असते. एखादं बाळ, पहिल्यांदा नातं समजून घ्यायचं शिकत असतं, आणि तेव्हा पोस्टमन येतो, एक जुना काळ परत जिवंत करतो .९० चा दशकातील पोस्टमन हा काळ होता . भावनांचा दूत होता आणि २१ व्या शतकातला पोस्टमन  एक बदलती ओळख, पण त्याचं अस्तित्व अजूनही आपल्याला जुन्या काळाशी जोडून ठेवणारं.कारण पोस्टमन म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर एका युगाची आठवण आहे. 

   आठवणी कधीही जुन्या होत नाहीत, त्या काळाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात… शांतपणे, सायकलच्या बेलसारख्या हलक्या आवाजात.

पाथर्डीत १९९६ च्या १०वी बॅचचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न १५० माजी विद्यार्थी व २४ शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

 पाथर्डीत १९९६ च्या १०वी बॅचचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न १५० माजी विद्यार्थी व २४ शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग


पाथर्डी (११ मे): श्रीतिलोक जैन विद्यालय, पाथर्डी येथे ११ मे रोजी १९९६ च्या १० वी बॅचचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. पाथर्डी तालुक्यातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे स्नेहसंमेलन ठरले असून यामध्ये जवळपास १५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व २४ माजी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव मा. श्री सतीशजी गुगले, प्राचार्य मा. श्री अशोकजी दौंड, जेष्ठ निवृत्त शिक्षक श्री सुभाषलालजी खाबिया, थोरात मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.ल

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश सानप, महेश बाहेती, भारत भडके, संजय शेटे, तात्यासाहेब करडभाजे, संदीप बडे, अरविंद खेडकर, हरीभाऊ वायकर, महेश इजारे, सारिका उरणकर, नीता आव्हाड, दिप्ती बाहेती, रेखा डाळींबकर व मनिषा वाळके यांनी विशेष प्रयत्न केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीभाऊ वायकर व नीता आव्हाड यांनी केले. प्रस्तावना महेश बाहेती, अध्यक्षीय सूचना भारत भडके, अनुमोदन सारिका उरणकर यांनी तर आभार संजय शेटे यांनी मानले. व्यासपीठाचे नियोजन महेश सानप, जेवण व्यवस्था पंकज मुनोत, सत्कार अरविंद खेडकर, स्वागत रघुनाथ शिवणकर,  अतुल टकले व तनवीर पठाण यांनी पाहिले. तर एकंदर व्यवस्था डॉ सचिन लोखंडे  यांनी सुरळीत पार पाडली

या संस्मरणीय स्नेहसंमेलनाने सर्वांना आपल्या शाळेच्या आठवणीत पुन्हा एकदा रंगून टाकले.

 शालेय क्रिकेटच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूलने दणदणीत विजय मिळवला. ----------------------------------- *फायनल मध्ये कृष्णा गायकवाड आणि अरशान पठाण चमकले*  ----------------------









बीड:- दि. 16.09.2024 रोजी शालेय क्रिकेटच्या तालुकास्तरीय स्पर्धा शिदोड येथील डी. एस. के.क्रिकेट ग्राउंड वर घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये खेळत असताना गुरुकुल  इंग्लिश स्कूल ने प्रथम मॅच मध्ये शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, द्वितीय मॅच मध्ये ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल, सेमी फायनल मध्ये नारायण इंग्लिश स्कूल तसेच फायनल मध्ये गणेश विद्यालय या संघासोबत अटीतटीच्या सामन्यांमध्ये  गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत गणेश विद्यालयाचा पराभव  दणदणीत विजय मिळवला.  या स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुका समन्वयक  उज्वल  गायकवाड, संजय धस, विस्तार आधिकारी  अभिजीत तांदळे,अझहर शेख, गायकवाड सर संतोष कवठेकर,शैलेश जाधव ,गाल्फाडे ,  तनवीर पठाण , उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले व स्पर्धा पार पडण्यास सहकार्य लाभले विजयी संघामधील  खेळाडू कृष्णा गायकवाड, आरशान 0पठाण यांनी नाबाद 70 रणाची भागेदारी  पाच ओव्हर मध्ये केली बॉलिन मध्ये आरशान पठाण शेवटच्या शतकात  फिरकी ने गुरुकुल संघाचं विजय निश्चित केला .या  सामन्यामध्ये कृष्णा गायकवाड चे तुफानी अर्धा शतक ( 55 रन) करून विजय मिळवण्या साठी मोलाचे योगदान दिले, सार्थक कोकरे,अन्वित सुभेदार, संग्राम तळेकर,मोहम्मद नबील, संविधान सावते,रणवीर राठोड, दिप काळे, शशांक सारंगकर, दुर्गेश झांबरे, आर्यन कुटे, कैवल्य मोहिते, शालू त्रिभुवन वरील खेळाडू 14 वर्षाखालील शालेय क्रिकेटच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये बीड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील  या विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक  कल्याण माने , रामदास गिरी, महेश गव्हाणे यांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे, सचिव डॉ.राजेंद्र ढाकणे, कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, प्राचार्य शीतल सर्वज्ञ, उपप्राचार्य अमोल कपूर, सारा मॅम, गणेश इंगोले सर, क्रीडा शिक्षिका वाघमारे मॅडम अन्य प्रशिक्षक व पालकांनी मुलांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक.

आरशान पठाणचा अष्टपैलू जलवा*".

 *युनिक स्पोर्ट्स बीड चंपावती प्रीमियर लीग अंडर १४ चे चॅम्पियन्स*!


*एसव्ही रॉयल्स ठरले उपविजेते*


"*आरशान पठाणचा अष्टपैलू जलवा*". 






(बीड स्पोर्टस बातमी )– दि.२२ जानेवारी-चंपावती प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात युनिक स्पोर्ट्स बीड संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एसव्ही रॉयल संघावर ३७ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला, मात्र युनिक स्पोर्ट्स बीडने अखेरच्या क्षणी खेळावर वर्चस्व मिळवत बाजी मारली.पहिला डाव – युनिक स्पोर्ट्स बीडची दमदार फलंदाजी

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत युनिक स्पोर्ट्स बीडने ३५ षटकांत १७९ धावांचा भक्कम डोंगर उभारला. संघाच्या डावाची सुरुवात स्थिर होती, पण मधल्या फळीत अरशान पठाण आणि जयनाथ पोपळे यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला मजबूत स्थितीत नेले. अरशान पठाणने ६० चेंडूत ५५ धावा फटकावत संघाचा डाव सांभाळला. त्याच्या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. जयनाथ पोपळेने संयमी खेळ करत ८६ चेंडूत ४७ धावा केल्या. मोहम्मद अफ्फाननेही ३७ धावांचे योगदान दिले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

एसव्ही रॉयलच्या गोलंदाजांनीही संघर्ष केला, पण युनिक स्पोर्ट्स बीडच्या फलंदाजांनी संयम राखत उत्कृष्ट भागीदारी केली आणि संघाला भक्कम स्थितीत नेले.

दुसरा डाव – *आरशान पठाणची जादुई गोलंदाजी* 

१७९ धावांचा पाठलाग करताना एसव्ही रॉयलने चांगली सुरुवात केली होती, मात्र युनिक स्पोर्ट्स बीडच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले. अरशान पठाणने आपल्या भेदक माऱ्याने एसव्ही रॉयलचे फलंदाज धडाधड माघारी पाठवले. त्याने ७ षटकांत केवळ ३७ धावा देत ७ बळी घेतले हॅट्रिक घेतली आणि सामन्याला कलाटणी दिली. पृथ्वी रामदास पालाने ७ षटकांत २४ धावा देत २ बळी घेतले, तर रुद्राक्ष  जाधवने ७ षटकांत ३३ धावा देत २ बळी मिळवले.

एसव्ही रॉयल संघ ३१.२ षटकांत अवघ्या १४२ धावांत बाद झाला आणि युनिक स्पोर्ट्स बीडने ३७ धावांनी विजय मिळवला.

*आरशान पठाण सामन्याचा हिरो ठरला*

या सामन्यात आरशान पठाणने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करत ‘सामन्याचा मानकरी’ (मॅन ऑफ द मॅच) पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्याची अष्टपैलू कामगिरी संघाच्या विजयाचा मुख्य आधार ठरली.संघव्यवस्थापन आणि चाहत्यांचा जल्लोष

या विजयासह युनिक स्पोर्ट्स बीड संघाने चंपावती प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावत आपल्या संघाच्या क्षमतेची चुणूक दाखवली. संघ व्यवस्थापकांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले असून आगामी स्पर्धांसाठी अधिक तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 चंपावती प्रीमियर लीग अंडर १४ २०२५ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर योगेश भैय्या क्षीरसागर,बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अमीर सलीम सर, बीड जि.प.सदस्य अशोक लोढा, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सदस्य, आम्ही बीडकर चे सर्व सदस्य व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अरशान पठाणचे शतक,सार्थक जाधव चे चार बळी आणि क्रुष्णा- पृथ्वीची फटकेबाजी; चंपावती लीग गाजवली!

 अरशान पठाणचे शतक,सार्थक जाधव चे चार बळी आणि क्रुष्णा- पृथ्वीची फटकेबाजी; चंपावती लीग गाजवली!




चंपावती प्रीमियर लीग ची धमाकेदार सुरुवात!


बीड,: चंपावती प्रीमियर लीगच्या अंडर-१४ स्पर्धेत दोन रोमांचक सामन्यांत खेळाडूंनी आपली अप्रतिम कामगिरी दाखवत संघांना मोठे विजय मिळवून दिले.


पहिल्या सामन्यात एस.व्ही.रॉयलने विशाल पाटील वॉरियरचा ११२ धावांनी पराभव केला. एस.व्ही.रॉयलने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८१ धावा केल्या. क्रुष्णा साचिन गायकवाडने १२८.०७ च्या स्ट्राइक रेटने ७३ धावांची खेळी केली, तर पृथ्वी आर. पाळने 54 धावा करत संघाचा डाव मजबूत केला. विशाल पाटील वॉरियर संघ फक्त ६९ धावांवर बाद झाला. देवव्रत जी. पवारने ४ गडी बाद करत चांगली कामगिरी केली.


दुसऱ्या सामन्यात युनिक स्पोर्ट्स बीडने एडीएफसीसी बीडचा १५२ धावांनी दणदणीत पराभव केला. युनिक स्पोर्ट्स बीडने २५ षटकांत ३ गडी गमावून २०८ धावा केल्या. अरशान पठाणने ७६ चेंडूत १० चौकार व 1 षटकारासह १०१ धावा केल्या तर ओमकार पवार यांनी 43 चेंडू 54 धावा केल्या,सार्थक जाधव ने चार षटकात गोलंदाजीत चार फलंदाज बाद केले तसेच अर्णव गिरी यांनी तीन विकेट्स आपल्या नावावर केले.एडीएफसीसी बीडचा डाव फक्त ११ षटकांत ५६ धावांवर संपुष्टात आला.


दोन्ही संघांनी आपल्या फलंदाज व गोलंदाजांच्या जोरावर स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे.

माजी_मंत्री_श्री_जयदत्त_आण्णा_क्षीरसागर

 माजी_मंत्री_श्री_जयदत्त_आण्णा_क्षीरसागर.



     राजुरी(न.) गावात जन्मलेले एक अतुलनीय व्यक्तीमत्व आपल्या कार्यामुळे जनतेच्या अविरतपणे असणाऱ्या प्रेमामुळे एक उमलत नेतृत्व अविरत उभे आहे.. बीड जिल्ह्यातील एक थोरले घर म्हणून या घराकडे पाहिले जाते... राजकारणाचे अनेक अष्टपैलू बाळकडू स्व.लोकनेत्या_केशरकाकू_क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनातील हृदयात पोहचलेल एक असामान्य व्यक्तिमत्व अविरतपणे विकास हाच ध्यास, विकास हाच धर्म, विकास हीच जात समजून सर्व समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करत  आहे... आज पर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करणारे जयदत्त आण्णा क्षीरसागर एक आजातपुरुष आहे... , गजानन सूतगिरणी, गजानन सहकारी बँक बीड बाजार समिती, बीड दूध संघ, पं. स.,जि. प. यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कौशल्याची ओळख करून देतात... निवडणुकीपूरते राजकारण व नंतर फक्त समाजकारण व विकास यासाठी ते सत्तेत असो किंवा नसो त्यांना मानाचे स्थान असते... स्व_गोपीनाथ_मुंडे यांच्या नंतर आज बघितले तर आण्णासाहेबाकडे पाहावे लागेल.. आजही त्यांच्या नावाचा दबदबा, रुबाब कायम आहे.. अनेक मातब्बर नेते आज आण्णांच्या विचारांना मानतात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच महत्वाचे असते.. लाखो लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात आण्णा सदैव बरोबर असतात..


   हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या


 राजकारणातील रथी, महारथीनां  आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत...

 वादळे येतात आणि जातात.

 आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे आण्णा  हे धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून  त्यांनी ठेवली आहे   ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. .तस पाहिले तर विकासाचा हा महापुरुष आज  ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता अनुभवी नेता ठरत आहे... आपली जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी  सदैव ते प्रयत्नशील असतात...

   क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागर कुटुंब  सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी  सोडवण्यासाठी खूप काही प्रेरणा देतो..


विकासाची ही गंगा नेहमी वाहत ठेवू, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे.. स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा ते चालवणारे विकासाचे महामेरू आहेत . त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील...


जनतेचा आधार, जनतेचा विश्वास,

जयदत्त क्षीरसागर नावाचा प्रकाश।

सेवेचं व्रत घेतलं हाती,

लोकांच्या सुखासाठी दिला सर्व स्वाती।


मातीतून उभे, साधेपणाचा राजा,

त्यांच्या कृतीत दिसतो 

जनतेचा आधार

जनतेच्या वेदना नेहमी ओळखून 

त्यांच्या समाधानासाठी झटतात, झगडतात।

 शिक्षणाची कास,

सर्वांसाठी उभारली प्रगतीची  आस।

राजकारण नाही फक्त सत्ता-मोहाची शिखर,

जनतेसाठी अर्पण केले सर्व जीवनभर।

जयदत्त नावाचे हे तेजस्वी तारा,

✍🏻तनवीर पठाण ✍🏻

स्मार्टफोनच्या दुनियेत माझे बाबा हरवले आहेत

 स्मार्टफोनच्या दुनियेत माझे बाबा हरवले आहेत 



आजचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. स्मार्टफोनने आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकला आहे. संवाद साधण्यापासून ते काम, मनोरंजन, आणि शिक्षणापर्यंत, स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु या स्मार्टफोनच्या वाढत्या व्याप्तीने माणसामाणसांतील नात्यांवरही परिणाम केला आहे. विशेषतः घरातील नात्यांवर. माझे बाबा, जे माझ्या आयुष्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत, ते देखील या स्मार्टफोनच्या दुनियेत कोठेतरी हरवले आहेत.  

 माझ्या लहानपणी बाबा म्हणजे माझ्यासाठी आदर्श होते. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली, शिकवलं, आणि आयुष्य कसं जगावं हे दाखवलं. त्यांनी मला गोष्टी सांगितल्या, अभ्यासात मदत केली, आणि प्रत्येक रविवारी आम्ही एकत्र वेळ घालवत असू. त्यांच्या प्रेमळ हातांचा स्पर्श आणि मार्गदर्शनामुळे मला एक वेगळं आयुष्य जगायला शिकता आलं. 

     परंतु जसजसं तंत्रज्ञानाचं वर्चस्व वाढलं, तसतसं सगळं काही बदलत गेलं. बाबांच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून, आमच्या नात्यातला तो गोडवा कमी होत गेला. बाबा आता सतत फोनमध्ये व्यस्त असतात. पूर्वी गप्पा मारण्यासाठी आणि खेळण्यासाठी वेळ देणारे बाबा, आता फोनच्या स्क्रीनवरून नजर हटवायला तयार नसतात.  

    स्मार्टफोनने बाबांच्या जीवनात खूप सोयी आणल्या आहेत. त्यांचं ऑफिसचं काम आता स्मार्टफोनवरच होतं. ईमेल्स तपासणं, मीटिंग्स अटेंड करणं, आणि महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण – हे सगळं आता स्मार्टफोनवर सहज शक्य झालं आहे. पण या सोयीसुविधांनी बाबांचा वेळ इतका व्यापून टाकला आहे की, त्यांना कुटुंबासाठी वेळ द्यायला अवघड होतं. कधी कधी मी बाबांना काही विचारायला जातो, तर ते फोनमध्ये गुंतलेले असतात. “एक मिनिट” असं म्हणत ते फोनवरच काहीतरी शोधत राहतात. त्या "एक मिनिटात" माझ्या मनात विचारांचे काहूर उठते – माझ्या बाबांना मी पुन्हा कधी भेटणार?  

   स्मार्टफोनने आमच्यात संवाद हरवला आहे. बाबांशी बोलण्यासाठी मला आता वेळ शोधावा लागतो. त्यांच्या दिवसाचा बहुतांश भाग स्क्रीनवर घालवला जातो, आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतो. त्यांची ऊर्जा आणि उत्साह कमी झाला आहे.  माझ्या बाबांची निखळ हसरी मुद्रा, जे कधीही मला दिलासा देत असे, ती आता फक्त कधीतरी दिसते. त्यांच्या कामाच्या धावपळीत आणि स्मार्टफोनच्या दुनियेत त्यांनी स्वतःलाही हरवून टाकलं आहे.  

    पूर्वीचे दिवस आठवले की माझं मन हळवं होतं. रविवारी आम्ही क्रिकेट खेळायचो, गप्पा मारायचो, आणि माझ्या शाळेच्या गोष्टी ऐकत ते माझं कौतुक करायचे. परंतु आता त्यांचं "रविवार"ही फोनवरच्या कामांसाठी आरक्षित असतो. स्मार्टफोनमुळे त्यांची असणारी सततची व्यस्तता कधी कधी माझ्या बालपणाची आठवण करून देते, जिथे बाबांशी असलेल्या जवळीकतेचा अनुभव मी आता फक्त आठवणीत शोधतो. स्मार्टफोन एक साधन आहे, जीवन नव्हे. तो आपल्याला सोयी देतो, पण तो माणसामाणसांतील नात्यांना कधीही पर्याय देऊ शकत नाही. बाबांना हे समजून घ्यायला हवं की, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात त्यांचा वेळ आणि उपस्थिती किती महत्त्वाची आहे. फक्त स्मार्टफोनच्या दुनियेत रमणं म्हणजे खरं जीवन जगणं नाही.  

     काही वेळा मला बाबांना सांगावंसं वाटतं की, "बाबा, तुम्ही माझे हिरो आहात. तुम्ही माझ्यासाठी स्क्रीनच्या पलीकडच्या गोष्टींपेक्षा जास्त मौल्यवान आहात.स्मार्टफोन हे आधुनिक युगाचं एक साधन आहे, परंतु त्याचा वापर मर्यादित असायला हवा. कुटुंबासाठी वेळ काढणं, नात्यांना जपणं, आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं हे आयुष्याचं खरं सार आहे. माझ्या बाबांना पुन्हा एकदा माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी वेळ काढायला शिकवायचं आहे. कारण, या स्मार्टफोनच्या दुनियेत हरवलेले बाबा पुन्हा माझ्या आयुष्यात असणं, हेच माझं स्वप्न आहे.  

तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा नातेसंबंध जास्त महत्त्वाचे आहेत.

इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची दैन्यावस्था

 इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची दैन्यावस्था



आजच्या आधुनिक आणि ग्लोबल युगात शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले आहेत. त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि चिंतेचा विषय म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे मराठी शाळांची झालेली दैन्यावस्था. एकेकाळी गावागावांमध्ये मराठी शाळा ह्या शिक्षणाचा मुख्य आधार होत्या. त्या शाळांनी अनेक कर्तबगार, अभ्यासू, सुसंस्कृत व्यक्ती घडवल्या. पण आज त्याच शाळा अस्तित्वासाठी झगडताना दिसतात.

स्वातंत्र्याच्या काळात मराठी शाळा म्हणजे शाळेचे खरे रूप होते. शिक्षकांचा आदर होता, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते आणि सर्वसामान्य कुटुंबही आपल्या मुलांना शिकवण्यासाठी झटत होते. पण जसजसे काळ बदलत गेला, तसतशी "इंग्रजी" ही भाषा प्रतिष्ठेचं, प्रगतीचं आणि यशाचं प्रतीक बनली. शहरांपासून गावांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आणि पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली.

पालकांच्या मनात एक गैरसमज निर्माण झाला की इंग्रजी माध्यमात शिकल्याशिवाय मुलांचं भविष्य उज्वल होणार नाही. या चुकीच्या समजुतीमुळे मराठी शाळांकडे पाठ फिरवली गेली. सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत मोठी घट झाली. शिक्षकांचे मनोबल कमी झाले. शिक्षक भरती थांबली किंवा बंद झाली. अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद होऊ लागल्या.

इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणं हा अनेकांसाठी "स्टेटस सिंबॉल" झाला. परंतु, इंग्रजी भाषा येणे आणि ती शिकणे हे आवश्यक आहे, पण त्यासाठी आपल्या मातृभाषेच्या शिक्षणाची बळी देणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न निर्माण होतो. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक वेळा भाषिक समज आणि विचार स्पष्टपणे मांडण्यात अयशस्वी ठरतात, कारण त्यांची मातृभाषेशी नाळ तुटलेली असते. दुसरीकडे, मराठी शाळांमधून शिकलेली अनेक मोठी व्यक्तिमत्त्वं समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वी ठरली आहेत.

मराठी शाळांमध्ये गुणवत्ता आहे, परंतु तिचं योग्य ब्रँडिंग, सुविधा आणि संधी यांची कमतरता आहे. अनेक ठिकाणी मराठी शाळा वयोवृद्ध इमारतींत चालतात, डिजिटल सुविधा नाहीत, नवोपक्रमांची कमतरता आहे, तर दुसरीकडे इंग्रजी शाळांमध्ये AC क्लासरूम्स, स्मार्ट बोर्ड, इंग्रजी बोलणारे शिक्षक, आणि आकर्षक युनिफॉर्म यामुळे पालक आणि विद्यार्थी आकर्षित होतात.

मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि पुन्हा त्यांचा गौरव वाढवण्यासाठी सरकारसह समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, आणि पालकांमध्ये जनजागृती करणे ही पावले उचलली गेली पाहिजेत. मातृभाषेतून शिक्षण हे बालकाच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे मराठी शाळांचे महत्त्व टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, "इंग्रजी शिका जरूर, पण मराठी शाळा आणि मराठी मातीशी नाळ जोडून ठेवा." कारण आपल्या संस्कृतीचं आणि अस्मितेचं मूळ या मातृभाषेच्या शिक्षणातच आहे. मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं साधन नाही, तर ती आपली ओळख, आपली मुळे आणि आपलं संस्कारक्षम पिढी घडवणारी शाळा आहे. त्यामुळे मराठी शाळांना वाचवणं म्हणजे आपल्या संस्कृतीला वाचवणं होय.

हरवलेलं पत्र आणि स्पर्शहीन संवाद

 हरवलेलं पत्र आणि स्पर्शहीन संवाद



आज दुपारी सहज जुने पुस्तके आणि कागदपत्र पाहत होतो त्या मध्ये आई-वडिलांनी आम्हाला पाठवलेली काहीं जुनी पत्र सापडली.ती पत्र वाचली तर क्षणभर स्तब्ध झालो आणि त्या जुन्या आठवणीत मी रमलो . खरंच  तो एक काळ वेगळाच होता, जेव्हा पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता तर तो माणसांच्या हृदयाचा ठाव होता. ९० चं दशक म्हणजे त्या भावना जपणाऱ्या अक्षरांचं सुवर्णयुग. साधं पत्र, पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय  प्रत्येकाकडे एक वेगळी आठवण, वेगळी गोष्ट असायची. त्या लिहिल्या ओळींमध्ये काळजी असायची, प्रेम असायचं, रागही असायचा, पण सगळं होतं *जिवंत*.

जेव्हा आईचं पत्र येत असे तेव्हा पानभर सूचना, पण त्या शेवटच्या दोन ओळींमध्ये मात्र तिचं जीवापाड प्रेम लपलेलं असायचं. कधी कधी एखादं आंतरदेशीयात पत्र येत असे त्यात शब्द कमी, पण भावनांचा समुद्र जास्त असायचा. पोस्टकार्डावरून एखादा मित्र थेट कुठल्या तरी प्रवासातली आठवण शेअर करत असे, आणि आपण ते वाचताना त्या जागी पोहोचलेलो असतो ते पण मनातून.

हळू हळू पुढे २१ वं शतक आले, आणि पत्रं मागे पडली. त्यांच्या जागी ई-मेल, फेसबुक मेसेज, व्हॉट्सॲप आलं. संवाद वाढला पण जवळीक हरवली. एकेकाळी आठवडाभर वाट पाहिलेलं पत्र, आता एका क्लिकमध्ये पोहोचतं  पण त्याला ना शाईचा सुगंध असतो, ना भावनांची खोली. पूर्वी एकच पत्र पन्नास वेळा वाचलं जात असे; आता एक मेसेज वाचून आपण मॅसेज स्क्रोल करतो.

खरंच त्या काळात पत्राचं वाचन म्हणजे संवादाचा सण होता. पत्र हातात घेतलं की त्याच्या कडांवरून त्या व्यक्तीचे हातसुद्धा जाणवायचे. आज, स्क्रीनवरून येणाऱ्या मेसेजला ना थरथरत्या बोटांचा स्पर्श असतो, ना मनाचं ओझं. डिजिटल माध्यमं वेगाने येतात आणि जातात, पण पत्रं मनात घर करून राहतात.

कधी कधी वाटतं  आजची मुलं कसं समजतील या साध्या कागदात दडलेली जादू? त्यांना काय कळणार, की प्रेमाचं खरं सौंदर्य हे स्क्रीनशिवाय असतं? की आई-वडिलांचं पत्र हृदयाच्या किती जवळचं असतं?

आज मला असं वाटतं शक्य झालं तर पुन्हा  एखादं साधं पत्र लिहाव आपल्या हाताने पेनाने कुणासाठी तरी. कारण तिथे शब्द नसतात फक्त  तिथे असतो एक श्वास, एक आनंद आणि एक हरवलेला काळ, जो पुन्हा जिवंत होण्याची वाट पाहतो आहे.

मोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ चांगले

 मोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ चांगले


      मोबाईलचा वापर हा आजच्या काळात अपरिहार्य झाला असला, तरी याचा अतिरेक हा गंभीर समस्यांना जन्म देतो. विशेषतः लहान मुले आणि तरुण पिढी मोबाईल गेम्समध्ये एवढी गुंतते की त्यांचं आयुष्यच मोबाईलच्या चौकटीत अडकून राहतं. या आभासी जगात हरवलेली मुले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून दुर्बळ बनतात. याच्या पार्श्वभूमीवर मैदानी खेळांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होतं.

मैदानी खेळ म्हणजे केवळ करमणूक नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा अविभाज्य भाग. क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो  कबड्डी,व इतर सर्वच खेळ हे  मुलांना शारीरिक व्यायामाची सवय लावतात. खेळताना शरीराची प्रत्येक हालचाल होते, स्नायूंना बळकटी मिळते, आणि हृदयाच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. सतत मैदानावर धावपळ केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, लठ्ठपणा दूर राहतो आणि फिटनेस आपसूकच टिकतो. त्यामुळे आजच्या मोबाईलवर बसून वेळ घालवणाऱ्या जीवनशैलीच्या तुलनेत मैदानी खेळ खूपच फायदेशीर ठरतात.

या खेळांमुळे मुलांचं मन प्रसन्न राहतं. मैदानावर खेळताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही मोबाईल गेममध्ये मिळू शकत नाही. खेळ म्हणजे उत्साह, जोश, चैतन्य आणि एक ऊर्जा! मैदानावर पावसात भिजून खेळणं, मातीमधे लोटांगणं घालणं, एकमेकांवर ओरडणं, हसणं-खेळणं ही सगळीच एक वेगळी दुनिया असते. ही अनुभूती प्रत्यक्ष मैदानावरच मिळते, मोबाईल स्क्रीनवर नव्हे.

मैदानी खेळ केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठीच नव्हे, तर मानसिक संतुलनासाठीही उपयोगी पडतात. खेळामुळे तणाव कमी होतो, मन शांत राहतं, आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर खेळामध्ये नेहमी एक संघभावना असते. क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांनी एकत्रित खेळल्याशिवाय यश मिळत नाही. फुटबॉल किंवा हॉलीबॉलमध्ये एका खेळाडूच्या चुका इतर जण भरून काढतात. यामुळे मुलांमध्ये सहकार्य, समर्पण आणि नेतृत्वगुण विकसित होतात.

खो-खो आणि कबड्डी हे भारतीय पारंपरिक खेळ तर अधिक ऊर्जावान आणि कौशल्यवर्धक आहेत. या खेळांमध्ये खेळाडूला एकदम सजग राहावं लागतं, निर्णय तत्काळ घ्यावे लागतात आणि प्रत्येक क्षण जागरूकतेनं खेळावा लागतो. या सवयी पुढे आयुष्यात खूप उपयोगी ठरतात.

मोबाईल गेम खेळणारा मुलगा अनेकदा एकटा पडतो. तो फक्त स्क्रीनकडे पाहतो, कानात हेडफोन, आणि सभोवतालचं जग त्याला विसरायला होतं. पण मैदानी खेळ खेळणारा मुलगा मित्रांमध्ये रमतो. तो संवाद साधतो, मजा करतो, संघर्ष करतो आणि शिकतो. हा अनुभव त्याला जीवनाचं खरं शिक्षण देतो.

पालक आणि शिक्षकांनी मुलांना मोबाईलच्या आहारी जाऊ न देता मैदानावर खेळायला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांना वेळ, सुविधा आणि मानसिक पाठिंबा द्यावा लागेल. कारण मैदानी खेळांमध्ये केवळ शरीर नव्हे, तर एक आरोग्यदायी, सुसंस्कृत आणि सशक्त समाज तयार होतो.

आज जर आपण मुलांचं बालपण वाचवायचं असेल, त्यांना खऱ्या अर्थानं घडवायचं असेल, तर त्यांना मैदानावर खेळायला लावणं हीच खरी गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतून राहणाऱ्या बोटांना खेळाच्या चेंडूचा स्पर्श, धावणाऱ्या पावलांना मैदानाची माती, आणि घामाने भिजलेल्या कपड्यांना यशाचा सुगंध मिळावा  हेच खऱ्या अर्थाने बालपणाचं सौंदर्य आहे.

या अधुनिक युगात जुने गुरुजी कोठे तरी हरवले

 या अधुनिक युगात जुने गुरुजी कोठे तरी हरवले...



कधीकाळी शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नव्हता. तो एक जीवनधर्म होता. शाळेच्या परिसरात गुरुजींची पाऊलवाट म्हणजे शिस्तीची, आदराची आणि प्रेमाची पाऊलवाट वाटायची. त्यांच्या आवाजात करडेपणा असायचा, पण त्यामागे असायचा नितळ प्रेमाचा सूर. पांढऱ्या धोतरात, खांद्यावर अंगोछा ठेवून आलेले गुरुजी केवळ शालेय शिक्षण देत नसत, तर आयुष्य शिकवत असत.

आज हे गुरुजी कुठे दिसतात? आजच्या यंत्रयुगात, टेक्नॉलॉजीच्या स्पीडमध्ये, आणि मार्कांच्या शर्यतीत ते कुठे तरी हरवले आहेत. आजचा शिक्षक स्मार्टफोन आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकवतो, पण 'संस्कार' देणारा, 'चरित्र' घडवणारा जुना गुरुजी मात्र दिसत नाही. शाळा ही शिक्षणाची फॅक्टरी झाली आहे आणि शिक्षक 'सर्व्हिस प्रोव्हायडर'. ज्ञानाचा व्याप झाला आहे, पण ज्ञानाचा अनुभव हरवला आहे.

जुने गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखायचे, त्यांच्या घरची परिस्थिती माहिती असायची. गरिबाच्या पोराला स्वतःच्या खिशातून वही घेऊन देणारे, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला रागावणारे, पण नंतर स्वतःहून वेळ काढून शिकवणारे गुरुजी आज कुठे दिसतात?

पूर्वी गुरुजींच्या शब्दाला आई-वडिलांच्या शब्दाइतकीच किंमत असायची. पण आज समाज बदलला, शाळा बदलल्या, आणि शिक्षकही बदलले. अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच आता मुलांच्या हाती मोबाईल आहेत, आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवर गुरुजींच्या डोळ्यांतली काळजी, प्रेम, शिस्त काहीच दिसत नाही.

या सगळ्यात जुने गुरुजी हरवलेत. त्यांच्या जागी आलेले आधुनिक शिक्षक ज्ञान देतात, पण अनुभव देत नाहीत; ते मार्गदर्शन करतात, पण ‘प्रेरणा’ नाही देत. शाळेचा तो जुना सुगंध, वर्गखोल्यांतील गजर, गुरुजींचा खड्या आवाजात घेतलेला हजेरीचा तास... हे सगळं आठवणींच्या धूसर कोपऱ्यात जाऊन बसलंय.

आज गरज आहे त्या जुन्या गुरुजींच्या विचारांची. जेवढं विज्ञान पुढं गेलंय, तेवढीच संस्कृती, मूल्यं, आणि शिक्षक-विद्यार्थी नातंही मागे गेलंय. आपण पुन्हा एकदा त्या मूळ मुळाशी जावं लागेल. कारण शिक्षक म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तर विद्यार्थ्याच्या मनाचा शिल्पकार असतो.

जुने गुरुजी हरवलेत का? की आपणच त्यांना दुर्लक्षित केलं? या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी जरूर करावा. कदाचित ते हरवले नाहीत… आपणच त्यांचं अस्तित्व विसरलो आहोत.

✍🏻तनवीर पठाण✍🏻

बाप ; आयुष्यभराची झटणारी सावली.

बाप ;

आयुष्यभराची झटणारी सावली. 

    आई जशी माया असते, तशीच बाप ही आधाराची भिंत असते. तो फारसा बोलत नाही, रडत नाही, पण मनात भावनांचा समुद्र घेऊन झटत राहतो. घरातील प्रत्येकाच्या गरजा भागवताना, त्याने स्वतःला कुठेच गृहीत धरलं असतं. दिवसाच्या उजेडापासून ते रात्रीच्या काळोखापर्यंत केवळ कुटुंबाच्या सुखासाठी तो आपला सारा वेळ, श्रम आणि स्वप्नं खर्च करत राहतो.

लहानपणी मुलांना चालायला शिकवणारा बाप, पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणारा, त्यांच्या हौशीसाठी स्वतःच्या इच्छा मारणारा असतो. त्याच्या अंगावर एकाच शर्टात अनेक हिवाळे, पावसाळे जातात, पण मुलांच्या डोळ्यातलं समाधान पाहून तो आनंदी राहतो. दिवसभर कष्ट करून रात्री थकवा अंगावर घेऊन तो फक्त एवढंच म्हणतो "सगळं नीट चाललं ना?"

मात्र हाच बाप जेव्हा वयाच्या उतरत्या वळणावर पोहोचतो, जेव्हा हातपाय थकतात, जेव्हा दृष्टि कमजोर होते, तेव्हा त्याचं स्थान घरात बदलायला लागतं. ज्यांच्या सुखासाठी त्याने आयुष्यभर संघर्ष केला, तेच मुलं हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. कोणाला वेळ नसतो, कोणाला त्रास वाटतो, कोणाला त्याच्या आजारपणाची जबाबदारी नको असते.

आज समाजात अनेक वृद्ध बाप वृद्धाश्रमात दिसतात. काही घरात असूनही एकटे असतात. मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी, सोशल मीडियावर व्यस्त असलेली मुले, आणि यंत्रवत जीवनशैलीत बापासाठी एक कप चहा किंवा दोन क्षणांच्या बोलण्यातसुद्धा जागा उरत नाही. तो जिवंत असतानाच त्याला दुर्लक्षित केलं जातं  कधी टोमणे मारून, कधी नजर चुकवून, कधी जबाबदाऱ्यांची चुकवणूक करून.

या सगळ्यात दुःखद बाब म्हणजे बाप तक्रार करत नाही. त्याच्या डोळ्यात थोडासा ओलावा असतो, पण ओठावर हास्य टिकवून तो म्हणतो, "सगळं ठीक आहे." पण आतून तो तुटत असतो, थकतो, हरवतो.

समाज म्हणून आपण या वास्तवाकडे डोळसपणे पाहायला हवं. बापाचं अस्तित्व केवळ पैशापुरतं मर्यादित नाही; त्याच्या अनुभवात, मार्गदर्शनात, शांततेत आणि त्याच्या अस्तित्वात एक अमोल ठेवा दडलेला असतो. ज्या झाडाखाली आपण सावली घेतली, त्यालाच वाळवणं हे अमानुष आहे.

आजही वेळ आहे. आपल्या वडिलांना केवळ ‘बाप’ म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून समजून घ्या. त्यांच्या अनुभवांना, भावनांना, गरजांना स्थान द्या. वृद्धापकाळ म्हणजे उपेक्षेचा काळ नाही, तर सन्मानाचा आणि आधाराचा काळ असावा. कारण आज जो बाप आहे, उद्या तो आपणही होऊ. आणि त्या वेळी आपल्यालाही कोणीतरी आपली आठवण ठेवावी, इतकीच माफक अपेक्षा असेल.

तो झिजतो, पण तक्रार करत नाही.

तो थकतो, पण थांबत नाही.

तो प्रेम करतो, पण मागत नाही...

तोच आहे  "बाप"

पालकांनो, आता तरी जागे व्हा


पालकांनो, आता तरी जागे व्हा!



आजचा काळ डिजिटल माध्यमांचा आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा अतिरेक झाला आहे आणि याचे गंभीर परिणाम आता आपल्या घरातच दिसू लागले आहेत  आपल्या मुलांच्या वाढीवर, विचारांवर आणि वर्तनावर.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक पालक मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. फेसबुकवर नवनवीन पोस्ट्स, यूट्यूबवरील व्हिडिओज, इन्स्टाग्रामवरील रिल्स यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. सुरुवातीला केवळ विरंगुळा म्हणून सुरू झालेली ही सवय आता व्यसनात बदलली आहे. आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, या सगळ्या धावपळीत, आभासी दुनियेत रमताना आपण आपल्या स्वतःच्या मुलांना दुर्लक्षित करू लागलो आहोत.

लहान मुलांचं वय हे शिकण्याचं, समजून घेण्याचं आणि जडणघडण होण्याचं असतं. त्यांना सतत आपल्या पालकांची गरज असते. केवळ पोटभर अन्न, चांगले कपडे आणि शाळेची फी पुरवून आपण जबाबदारी संपली असं समजतो, पण त्यांना तुमचा वेळ, तुमचं लक्ष, तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन या सगळ्यांची खरी गरज असते.

दुर्दैवाने, पालक मोबाईलमध्ये बुडालेले असताना मुलं एकटी पडतात. मग त्यांना दिशा देणारा कोणीच नसतो. ते इंटरनेटवर जे पाहतात, ऐकतात तेच त्यांचं "ज्ञान" होतं. चुकीची माहिती, हिंसक गेम्स, आक्रमक भाषा, बनावट स्टार्स – हे सगळं त्यांच्या मनात खोलवर बसतं. आणि पालकांना त्याचा पत्ता लागत नाही  कारण ते त्याच वेळी फेसबुकवर पोस्ट वाचण्यात किंवा इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्यात व्यस्त असतात.

मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात, काही भीती असते, काही स्वप्नं असतात  पण ते कुणाला सांगावं? जर आईबाबा सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, तर मुलं शेवटी गप्प होतात. संवादच राहात नाही. आणि संवाद नसेल, तर नातं हळूहळू तुटायला सुरुवात होते.

आज पालक म्हणून आपली जबाबदारी केवळ मुलांना शिक्षण देण्यापुरती नाही. आपण त्यांच्या आयुष्यातला "पहिला मित्र", "पहिला शिक्षक", आणि "सर्वात मोठा आधार" असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणं  हे अत्यंत आवश्यक आहे.

पालकांनो, मोबाईलमधील आभासी जगात कितीही मजा वाटली, तरी खरी दुनिया ही तुमच्या घरात आहे  तुमच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या हसण्यात, त्यांच्या आशांमध्ये. त्यांच्यावर लक्ष द्या, त्यांचं लहानपण तुमच्या बरोबर घालवा. कारण हे क्षण पुन्हा कधीच परत येणार नाहीत.

तुमच्या एका चुकीच्या दुर्लक्षामुळे त्यांचं आयुष्य भरकटू शकतं. पण तुमच्या एका योग्य कृतीमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतं.

शेवटी एव्हढेच सांगेल

फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम थोडं बाजूला ठेवा... आणि आपल्या पाल्यावर लक्ष द्या!

कारण उद्या जेव्हा आपण वेळ द्यायला मोकळे असू, तेव्हा वेळ असेल... पण मूल आपल्या मनातून लांब गेलेलं असेल!

सावधान! लहान मुलांना येऊ लागले हृदयविकाराचे झटके

 


     कधी काळी हृदयविकार म्हणजे वृद्धत्वाचं लक्षण मानलं जात होतं. वय वाढलं की शरीर थकतं, आणि मग हृदय कमजोर होतं, असं सर्वसामान्यपणे गृहीत धरलं जात होतं. पण गेल्या काही वर्षांत ही समजूत साफ खोटी ठरत चालली आहे. आज हृदयविकाराचे झटके अगदी लहान वयातील मुलांनाही येत आहेत, आणि ही गोष्ट केवळ चिंताजनक नाही, तर धोक्याची घंटा आहे.

आपल्याला वाटतं की लहान मुलं म्हणजे खेळत-धावणारी, चैतन्याने भरलेली जीवशैली असलेली छोटी ऊर्जा-केंद्रं असतात. पण आज त्या चैतन्याला गळा दाबणारा सायलेंट शत्रू आपल्याच हातांनी त्यांच्या आयुष्यात घुसवला जातोय – तो म्हणजे आधुनिक जीवनशैली. मोबाइल, इंटरनेट, टीव्ही, जंकफूड आणि तणावाने भरलेलं शिक्षण यामुळे लहान वयातच शरीरावर आणि मनावर ताण निर्माण होतोय.

आजची मुलं शाळा, क्लासेस आणि गृहपाठ यामध्ये इतकी गुरफटली आहेत की त्यांना खेळायला वेळच मिळत नाही. पूर्वीची संध्याकाळची मैदानी खेळाची सवय आता मोबाईल गेम्स, यूट्यूब व्हिडिओ आणि सोशल मीडियाने बदलली आहे. घरात बसून सतत स्क्रीनकडे बघत बसणं, अंगावर हलचल न होणं, आणि डोळ्यांना व मेंदूला थकवणारी डिजिटल व्यस्तता – हे सगळं एकत्र येऊन शारीरिक आरोग्याला सुरुंग लावत आहे.

त्यात भर म्हणजे घरातच मुलांना सहज मिळणाऱ्या जंकफूडची सवय. बर्गर, फ्राईड चिप्स, पिझ्झा, सॉफ्ट ड्रिंक्स – हे केवळ चवीनं भरलेले नसतात, तर हृदयाला घातक ठरणाऱ्या घटकांनीही भरलेले असतात. भरपूर साखर, मीठ, ट्रान्स फॅट्स – हे लहान वयातच रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागतात, कोलेस्टेरॉल वाढतं आणि हृदयाचा ठोका बदलतो. परिणामी, जे आजार पूर्वी ५०-६० वयात दिसत होते, ते आता १०-१५ वर्षांच्या मुलांमध्ये दिसू लागले आहेत.

शारीरिक स्वास्थ्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचा मोठा वाटा असतो. पण आज मानसिक आरोग्यही डगमगतं आहे. सततची अभ्यासाची स्पर्धा, पालकांची अपेक्षा, परीक्षेचा ताण, आणि मैत्रीच्या नात्यांमध्ये निर्माण होणारी अस्थिरता – यामुळे मुलं सतत मानसिक दबावाखाली असतात. झोपेची कमतरता, भीती, अस्वस्थता – हेही हृदयावर परिणाम करणारे घटक आहेत.

हृदयविकाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते बऱ्याच वेळा 'साइलेंट किलर' असतो. सुरुवातीला फारसं काही जाणवत नाही. मुलांना दम लागतो, चक्कर येते, थोडंसं चाललं तरी थकवा जाणवतो – पण याकडे पालक सहसा दुर्लक्ष करतात. "खेळून थकलेत" असं समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि जेव्हा खरी अडचण येते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

हृदय हे शरीराचा मुख्य भाग आहे – ते फक्त एक अवयव नाही, तर आयुष्याची गती आहे. हे हृदय लहानग्यांचं असेल तर त्याची काळजी घेणं ही जबाबदारी अधिक मोठी ठरते. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे फक्त त्यांचं वजन, उंची किंवा मार्क्स पाहून नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष देत पाहिलं पाहिजे. दररोज खेळायला वेळ मिळावा म्हणून वेळापत्रक आखावं लागेल. घरातील आहारात चौरस आहार, फळं, भाज्या, दूध, आणि प्रथिनांचा समावेश करायला हवा. झोप वेळेवर आणि पुरेशी असावी.

या सगळ्याबरोबरच सर्वसामान्य तपासण्या करणे, डॉक्टरांचा सल्ला घेणं, काही लक्षणं दिसल्यास लगेचच दुर्लक्ष न करता उपचार घेणं आवश्यक आहे. काही वेळा आनुवंशिकतेचा भागही असतो, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आजच्या सवयींचं आहे.

ही वेळ आहे बदलाची. आपली पिढीच नव्हे, तर पुढची पिढी निरोगी ठेवायची असेल तर आजच निर्णय घ्यावे लागतील. मुलांचे हसरे चेहरे, बागडणं, आणि खेळामधील ऊर्जा ही त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची खरी ओळख असावी. तंत्रज्ञानाच्या या युगात आपण तंत्रावर मात करून आरोग्य जपण्याचं शहाणपण दाखवलं, तरच उद्याचं भविष्य निरोगी, सुदृढ आणि सुदैवी असेल.

लहानग्यांच्या नाजूक हृदयात आनंदाचे ठोके कायम राहावेत, हीच खरी काळाची गरज आहे.

✍🏻तनवीर पठाण

क्रिकेटच्या खेळातील उतार-चढाव खचून न जाता पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा


     क्रिकेट  हा शब्द उच्चारताच अनेकांच्या डोळ्यांपुढे एक सजीव चित्र उभं राहतं. मैदानावर खेळणारे खेळाडू, प्रेक्षकांच्या जोरदार घोषणा, संघासाठी लढणं आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार. पण या खेळामागे एक मोठा आयुष्याचा संदेश लपलेला आहे  तो म्हणजे *उतार-चढाव* स्वीकारण्याची ताकद आणि *खचून न जाता पुन्हा उठून उभं राहण्याची प्रेरणा*.

 क्रिकेट म्हणजेच आयुष्याचं प्रतिबिंब

क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर जीवनाची एक शाळा आहे. यात यश आहे, अपयश आहे, संघर्ष आहे, आशा आहे, निराशा आहे आणि त्यातून शिकण्याचं बळ आहे. एखाद्या खेळाडूने जसे 100 धावा केल्या तरी दुसऱ्या दिवशी तो ‘गोल्डन डक’ देखील होऊ शकतो. जीवनातही असेच असते  एक दिवस यशाचं शिखर असतं, आणि दुसऱ्या दिवशी अचानक अपयशाचा धक्का बसतो. पण यातूनच खरी शिकवण मिळते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही.

अपयश  एक संधी असते, शिक्षा नव्हे

क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू सतत अपयशी ठरतो. त्याच्यावर टीका होते, त्याचा आत्मविश्वास ढळतो. पण तो जर प्रयत्न थांबवला नाही, सराव सुरू ठेवला, चुका सुधारल्या तर तोच खेळाडू भविष्यात सामना जिंकवणारा ‘मॅच विनर’ ठरतो. उदाहरणच घ्या विराट कोहलीचं – 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात तो अपयशी ठरला, पण 2018 मध्ये त्याच इंग्लंडमध्ये शतकांच्या पावसाने टीकाकारांची तोंडं बंद केली. यावरून हेच सिद्ध होतं की अपयश हे अंतिम नसतं, ते एक पायरी असते  पुढच्या यशासाठी!


  संघटनेतून मिळतो आत्मविश्वास


क्रिकेट संघ खेळ आहे. इथे खेळाडू वैयक्तिक कौशल्य दाखवतो, पण संघ त्याचा आधार असतो. खेळात अपयश आलं, तरी कर्णधार, प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडू जर पाठिंबा देत राहिले, तर तो खेळाडू अधिक जोमाने पुढच्या संधीसाठी सज्ज होतो. जीवनातसुद्धा तसेच आहे आपले कुटुंब, मित्र, शिक्षक किंवा मार्गदर्शक जर खंबीरपणे आपल्या सोबत उभे असतील, तर कोणतंही अपयश आपल्याला लांबवर रोखू शकत नाही.


 संयम, शिस्त आणि सातत्य यशाची खरी गुरुकिल्ली


कोणत्याही खेळात शिस्त आणि सातत्य हे अत्यंत महत्त्वाचे असतात. रोजचा सराव, आहार, झोप, मानसिक तयारी हे सगळं यशाच्या प्रवासात मूलभूत आहे. कोणत्याही परिस्थितीत संयम राखणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं हे देखील खेळाचाच एक भाग आहे. एखादा खेळाडू जेव्हा सातत्याने सराव करतो, चुका सुधारतो, तेव्हाच तो यशस्वी होतो.


प्रत्येक चढावानंतर उतार, आणि प्रत्येक उतारानंतर चढाव असतो


क्रिकेटमध्ये असे अनेक सामने घडले आहेत, जेथे एखादा संघ सुरुवातीला कोसळला, पण नंतरच्या डावात अथवा शेवटच्या काही षटकांत आश्चर्यकारक पुनरागमन करत विजय मिळवला. या गोष्टी आम्हाला हे शिकवतात की *परिस्थिती कितीही खराब असली तरी शेवटपर्यंत झगडणं आवश्यक आहे*. कधी कधी अंतिम क्षणांपर्यंत सामना जिंकायची शक्यता नसते, पण जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नांमुळे चमत्कार घडतो.

खचून न जाता काय करावं?

1. स्वतःवर विश्वास ठेवा  अपयश आले तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका.

2.सकारात्मक रहाटीका ऐका, पण स्वतःची मानसिकता मजबूत ठेवा.

3. सराव सुरू ठेवा सराव हेच यशाचं खरं शस्त्र आहे.

4. दुसऱ्यांकडून शिका अनुभवी खेळाडूंकडून मार्गदर्शन घ्या.

5. हरलेल्या सामन्यातही शिकवण असते चूक कुठे झाली हे शोधा आणि सुधारणा करा.


 उदाहरणे प्रेरणादायी खेळाडू

सचिन तेंडुलकर 22 वर्षांचा संघर्ष, अपयश, दुखापती आणि तरीही यशाची उंची.

एम.एस. धोनी सुरुवातीला अपयशी, पण संयम आणि नेतृत्त्व गुणांमुळे महान कर्णधार ठरले.

युवराज सिंग  कॅन्सरमधून पूर्ण बरे होऊन परत मैदानात आणि देशासाठी खेळले.

   क्रिकेटमध्ये एक चेंडू तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण तो चेंडू खेळण्यासाठी तुम्ही खेळत राहायला पाहिजे. एक अपयशी सामना तुमचं आयुष्य ठरवत नाही, पण त्या अपयशातून शिकून पुढे जाण्याची तुमची वृत्ती ती तुम्हाला खऱ्या अर्थाने ‘विजेता’ बनवते.

खचू नका, जिद्द ठेवा, सराव करा आणि मैदानात पुन्हा उतरा कारण सामना अजून संपलेला नाही!*

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...